धाराशिव: "उद्धव ठाकरे भेटत नाहीत" असे रडगाणे गाणारे आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना भेटायला इतके का घाबरत आहेत? असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी उपस्थित केला आहे.
ॲड. भोरे यांनी शिंदेंच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार प्रहार करताना म्हटले की, "एकीकडे 'धर्मवीर' चित्रपटात स्वतःचे धाडस दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनाही न घाबरणारा सीन दाखवणारे शिंदे, प्रत्यक्षात आपल्याच कार्यकर्त्यांना कधीपासून घाबरायला लागले? कारण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौऱ्यामधे झालेल्या गोंधळाचे कारण देत खबरदारी म्हणून कार्यकर्त्यांना पहाटे घरातून उचलून नजरकैदेत ठेवण्यात आल्याचे माध्यमातून प्रसारित झाले आहेत.
शिंदेंना आता स्वतःच्याच कार्यकर्त्यांना भेटण्याची तर भीती नाही वाटू लागली ? जर तसे नसेल, तर मग धाराशिवमध्ये त्यांच्याच दौऱ्याआधी अविनाश खापे, नितीन पाटील, प्रवक्ता योगेश केदार यांच्यासह अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांना पहाटे घरातून उचलून नजरकैदेत ठेवण्याचे 'पाप' कशासाठी?"
रझाकारी मानसिकतेचा निषेध:
पुढील टीकेत भोरे म्हणाले की, "निजामी राजवटीत ज्याप्रमाणे दडपशाही करून जनतेचा आवाज दाबला जायचा, तसाच प्रकार आज धाराशिवमध्ये पाहायला मिळाला. लोकशाहीत संवादाला महत्त्व असते, पण या सरकारमध्ये फक्त 'नजरकैद' आणि 'दहशत' उरली आहे. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राबवली जाणारी ही कार्यपद्धती म्हणजे नव्या रूपातील 'रझाकारी' मानसिकता तर नाही ना?"
शिवसैनिकांचा अपमान आणि भाजप पुत्राला पायघड्या:
"स्वतःला 'शिवसैनिक' म्हणवून घेणारे आणि स्वाभिमानासाठी उठाव केला असे सांगणारे शिंदे एकीकडे शिवसैनिकांना नजरकैदेत टाकत आहेत,विमानतळावर स्वागतासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना अडवून धरले
तर दुसरीकडे भाजप आमदारपुत्राला 'रेड कार्पेट' आणि 'डायरेक्ट एन्ट्री' दिली जात आहे. हाच का तुमचा शिवसैनिकांचा स्वाभिमान? सत्तेसाठी लाचारी पत्करणारे हे जनतेच्या मनातली भीती घालवण्याऐवजी, स्वतःच्या कार्यकर्त्यांनाच नजरकैदेत ठेऊन घाबरवण्याचे काम करत आहे," अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेचे जिल्हा समन्वयक ॲड. संजय भोरे यांनी जोरदार प्रहार केला आहे
0 Comments