श्री क्षेत्र तुळजापूर येथे आज सायंकाळी नरक चतुर्दशी व दर्श अमावस्येच्या मुहूर्तावर पारंपरिक श्री काळभैरवनाथाचा भेंडोळी उत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शेकडो वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या अनादी परंपरेला यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्राचीन परंपरेनुसार प्रथम भैरवनाथाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर भैरवनाथाच्या कड्यावर पारंपरिक भेंडोळी प्रज्वलित करण्यात आली. ही पेटलेली भेंडोळी पुजारी बांधवांनी खांद्यावर घेत, घोष, जयघोष करत महंत मठाच्या मार्गे शिवाजी दरवाजातून श्री तुळजाभवानी देवींच्या मंदिरात आणली. मंदिरात प्रदक्षिणा घालून भेंडोळी श्री तुळजाभवानी देवींच्या सिंहासनाला भिडविण्याची शेकडो वर्षांची परंपरा यंदाही भक्तिभावाने पार पडली.
या पारंपरिक विधीचा अनुभव घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. उत्सवाच्या दरम्यान परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. जय भवानीच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
विशेष म्हणजे भेंडोळीचा उत्सव देशभरात काशी नंतर फक्त तुळजापूरातच साजरा केला जातो, अशी परंपरा आहे. त्यामुळे तुळजापूरला 'दक्षिण काशीचे महात्म्य' लाभले असल्याचे मानले जाते.
यावेळी दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज यांनी भेंडोळी मंदिरात येताच तिच्यावर तेल अर्पण करून दर्शन घेतले. या सोहळ्यास मंदिर संस्थानचे विश्वस्त मा.आ.राणाजगजितसिंह पाटील साहेब, तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त अरविंद बोळंगे, महंत तुकोजी बुवा, वाकोजी बुवा, चिलोजी बुवा, हमरोजी बुवा, लेखाधिकारी संतोष भेंकी, धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले, अनुप ढमाले, रामेश्वर वाले, लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, नागेश शितोळे तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री काळभैरवनाथ भेंडोळी उत्सवामुळे तुळजापूर नगरीत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धार्मिकतेचा व आध्यात्मिकतेचा संगम अनुभवायला मिळाला. श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा अविभाज्य भाग असलेला हा उत्सव तुळजापूरच्या सांस्कृतिक वैभवाचा अजून एक अभिमानाचा अध्याय ठरला.
0 Comments