देशसेवेचा गौरवशाली क्षण बार्शी शहरात पाहायला मिळणार आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पुच्छ सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याला चोख उत्तर देत आपल्या शौर्याची अमिट छाप उमटवणारे युवराज उर्फ बाळासाहेब डमरे यांचा बार्शीकरांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
हा सत्कार गुरुवार, दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता, शिवशक्ती मैदान, गगनगिरी हॉस्टेलसमोर, बार्शी येथे आयोजित करण्यात आला आहे.
युवराज डमरे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांच्या वडिलांनी — दिलीपकुमार डमरे यांनी आपल्या कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी रिक्षा चालवत मुलांना उच्च शिक्षण दिले. संघर्षातून उभं राहिलेलं हे कुटुंब आज देशासाठी अभिमानाचा विषय ठरलं आहे. दिलीपकुमार डमरे यांचे दोन्ही सुपुत्र भारतीय सैन्यात कार्यरत आहेत. त्यातील मोठे सुपुत्र प्रसाद डमरे आणि धाकटे युवराज (बाळासाहेब) डमरे हे दोघेही देशसेवेत तत्पर आहेत.
दिलीपकुमार डमरे यांनी आयुष्यात केवळ आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडली नाही, तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय सहभाग दिला.
युवराज डमरे यांच्या शौर्यामुळे बार्शी शहरासह त्यांच्या परिसरातील — कासारवाडी रोड, श्री शिवाजी महाविद्यालय रोड, ढगे मळा, भीमनगर या भागातील नागरिकांनी एकत्र येऊन हा सन्मान आयोजित केला आहे.
त्यांची माता सुनीता दिलीपकुमार डमरे या आपल्या दोन्ही पुत्रांच्या देशसेवेमुळे अभिमानाने नतमस्तक आहेत.
बार्शीकरांसाठी हा केवळ सत्कार नाही, तर एका संघर्षातून उभ्या राहिलेल्या कुटुंबाच्या प्रेरणादायी प्रवासाचा उत्सव आहे.
0 Comments