बार्शी : गाव असो वा पुणे, मुंबई. दिवाळीला बार्शीत येऊन शाळेच्या मित्रांना भेटण्याची ओढ वेगळीच असते. अशाच एका मित्रांच्या ग्रुपने 10 वर्षातील आपला युवाबंध अधिक मजबूत केलाय. तर, सामाजिक दायित्व जपत पूरग्रस्ताना मदतीचा हात देखील दिलाय. 2015 सालच्या दहावीच्या बॅचमधील बालमित्रांनी स्थापन केलेल्या ‘युवाबंध फाउंडेशन, बार्शी’ या संस्थेमार्फत दिवाळीच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जोपासत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला हे सर्व मित्र एकत्र येऊन स्नेहभेट घेतात. उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने हे तरुण वेगवेगळ्या ठिकाणी स्थायिक असले तरी, दरवर्षी स्नेहभेटीचा नित्यक्रम अव्याहत सुरू आहे. यावर्षी मात्र मराठवाडा आणि बार्शी तालुक्यातील पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या तरुणांनी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखली.
युवाबंध फाउंडेशनच्या वतीने सर्व सदस्यांकडून स्वेच्छेने वर्गणी गोळा करून एकूण ₹१५,०००/- (पंधरा हजार रुपये) इतकी मदत जमा करण्यात आली. ही रक्कम माननीय नायब तहसीलदार संजीवन मुंडे साहेब यांच्याहस्ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्यात आली.
सध्याच्या काळात तरुणांकडे सामाजिक भान नाही, असे म्हटले जाते. मात्र, बार्शीने नेहमीच सामाजिक आणि संस्काराचा वसा जपला आहे. त्यामुळेच, या तरुणांनी दाखवलेली एकजूट, संवेदनशीलता आणि जबाबदारी हे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. बार्शी शहर व तालुक्यातून या युवा मित्रांच्या या सामाजिक बंधाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments