परांडा
धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोठा दणका दिला आहे. परंड्याचे माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवारांची साथ सोडत राहुल मोटे हे अजित पवारांचे घड्याळ हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहुल मोटे यांचा पक्ष प्रवेश आज दिनांक ५ ऑगस्ट रोजी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात होणार आहे.
परंडा मतदारसंघातून राहुल मोटेंनी ५ वेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. सलग तीन वेळा ते आमदार राहिले आहेत. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या तानाजी सावंताकडून दीड हजारांच्या फरकाने राहुल मोटे यांचा पराभव झाला होता. राहुल मोटे यांच्या पक्ष प्रवेशामुळे धाराशिवमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ आणखी वाढणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे सांगितले जात आहे.
शेकडो कार्यकर्ते भूम परंडा वाशी मतदारसंघातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसह शरद पवार यांना हा मोठा झटका मानला जात आहे. निसटत्या पराभवानंतर राहुल मोटे हे धाराशिव जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत.
0 Comments