चांदणी नदीच्या महापुरामुळे शेतीचे मोठे नुकसान; सदोष पाऊस मापन यंत्रावरून गावकऱ्यांचा रोष
परांडा :
चांदणी नदीला आलेल्या अलीकडच्या महापुरामुळे परांडा तालुक्यातील सिरसाव, वाकडी व भांडगाव या गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे निरीक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांनी या गावांचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढा वाचला.
या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांनी या भागातील पूरनुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दिले. तसेच, चांदणी नदीवरील पुलाचे काम दोन वर्षे से रखडलेले असल्याच्या गावकऱ्यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडे त्वरित अहवाल मागितले आहे. गावकऱ्यांची मागणी होती, की पुलाचे काम तातडीने पूर्ण व्हावे.
सिरसाव गावात झालेल्या मोठ्या प्रमाणातील नुकसानामुळे ग्रामस्थांनी सरसकट पंचनामा करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदोष पर्जन्यमापक यंत्रामुळे पाऊस कमी दिसून आल्याने अधिकाऱ्यांना खरी परिस्थिती कळत नाही, परंतु प्रत्यक्षात सिरसाव पंचक्रोशीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महापुरामध्ये गावातील दोन नागरिकांच्या विहिरी वाहून गेल्या असून, नदीकाठच्या आठ ते दहा शेतकऱ्यांचे सोलार पंप ही पुराच्या पाण्यात बुडाले आहेत. यामुळे नदीकाठच्या शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीतील पंचनामे लगेच करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
या दौऱ्यादरम्यानच, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष यांनी जिल्हा परिषदेच्या सिरसाव येथील प्राथमिक शाळेचे निरीक्षण केले. शाळेची दुरावस्था, जीर्ण झालेली इमारत आणि मैदानाच्या प्रश्नावर ते बोलले. शाळेच्या आवारात झालेले अतिक्रमण पाहून घोष यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांना जबाबदार धरले. शाळेतील अतिक्रमण ताबडतोब हटविण्याचे आदेश दिले, नाहीतर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला. या वेळी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.
0 Comments