मोहोळ तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही, अशा क्षुल्लक कारणांवरून एका सावत्र आईने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. कीर्ती नागेश कोकणे असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे हिला अटक केली आहे.
नागेश कोकणे हे त्यांची दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिल्या पत्नीच्या दोन मुली, कीर्ती आणि आकृती, यांच्यासोबत वडवळ स्टॉप येथे भाड्याच्या घरात राहत होते. गेल्या काही काळापासून सावत्र आई तेजस्विनी या दोन्ही सावत्र मुलींचा सतत छळ करत होती. जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यांसारख्या सामान्य कारणांवरून ती मुलींना अमानुष मारहाण करत होती, अशी माहिती समोर आली आहे.
शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास याच रागाच्या भरात तेजस्विनीने तीन वर्षीय कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली. या गंभीर प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वडवळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments