सोलापूर |
उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथील तलाठी विजय हणमंतप्पा विजापुरे (रा. मड्डी वस्ती) याला ६० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी पाच वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. ही कारवाई अतिरिक्त सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांच्या न्यायालयाने केली.
तक्रारदाराच्या आत्याच्या मृत्यूपत्रानुसार आणि न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे जमिनीच्या फेरफार नोंदणीसाठी सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी विजापुरे याने ६० हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. त्यानंतर सापळा रचून विजापुरे याला रंगेहाथ अटक करण्यात आली होती.
त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक गणेश जवादवाड व सहायक फौजदार नीलकंठ जाधवर यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. कोर्ट पेरवीसाठी सहायक फौजदार सायबण्णा कोळी, बाणेवाले, घुगे यांनी काम पाहिले.
सरकार पक्षातर्फे अॅड. माधुरी देशपांडे यांनी युक्तिवाद केला तर आरोपीतर्फे अॅड. राहुल खंडाळे यांनी बाजू मांडली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीस दोषी ठरवत ५ वर्षे सक्तमजुरी आणि ४,००० रुपयांचा दंड ठोठावला.
0 Comments