.
बार्शी | पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या एका निर्घृण खुनाच्या गुन्ह्यात, आरोपी महादेव बाजीराव मुंढे (रा. उक्कडगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) याला बार्शी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. कौटुंबिक जमिनीच्या वादातून झालेल्या या खुनाने परिसरात खळबळ उडाली होती.
घटनेची हकीकत अशी की, २७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास उक्कडगाव येथील पांगरी ते येरमाळा रस्त्यावर बाबूराव सांगळे यांच्या घरासमोर सर्जेराव सोमनाथ मुंढे (वय ६१, रा. उक्कडगाव) यांचा खून करण्यात आला होता. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, मयत सर्जेराव मुंढे आणि आरोपी महादेव बाजीराव मुंढे हे चुलत भाऊ होते. त्यांच्यात वडिलोपार्जित ६ एकर शेतजमिनीवरून वाद सुरू होता, ज्यासाठी बार्शी दिवाणी न्यायालयात दावाही दाखल करण्यात आला होता. आरोपी महादेव मुंढे हा "आम्हाला मिटवायचे नाही आणि आम्ही तुम्हाला जमीन तसेच विहिरीचे व बोअरचे पाणी देखील देणार नाही," असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत होता.
२७ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६:४५ ते ७:१५ वाजण्याच्या सुमारास उक्कडगाव येथे बाबूराव सांगळे यांच्या घरासमोर रोडवरील लाईटच्या खांबाखाली, फिर्यादीचे पती सर्जेराव सोमनाथ मुंढे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी महादेव बाजीराव मुंढे, गणेश महादेव मुंढे आणि बाजीराव कृष्णा मुंढे (सर्व रा. उक्कडगाव) यांच्या विरोधात पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्ट्रर क्रमांक १५/२०२०, भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासी अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिवाजी शिरसाट यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास केला. प्रत्यक्षदर्शी आणि अप्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या चौकशीतून असे निष्पन्न झाले की, आरोपी महादेव मुंढे याने मयताला मारहाण करून खाली पाडले आणि जवळील एक मोठा दगड उचलून सर्जेराव मुंढे यांच्या चेहऱ्यावर घालून त्यांचा खून केला. त्यानंतर आरोपीला ताब्यात घेऊन सबळ पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच डॉक्टरांची साक्ष तपासण्यात आली. यातील तात्याराव मुंढे, सुनील सानप, आयडिया कंपनीचे नोडल अधिकारी आणि पोलीस कॉन्स्टेबल मनोज जाधव यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. तसेच, तपासादरम्यान गोळा केलेले पुरावे सरकारी वकिलांनी माननीय न्यायालयासमोर मांडले.
सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांचा विचार करून, माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश विक्रमआदित्य मांडे यांनी आरोपी महादेव बाजीराव मुंढे याला भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा आणि ३ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास, आरोपीला एक महिन्याचा साधा कारावास भोगावा लागेल. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील दिनेश देशमुख आणि प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले. तसेच, जालिंदर नालकुल (उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी) आणि हेमंतकुमार काटकर (सहाय्यक पोलीस निरीक्षक, पांगरी पोलीस ठाणे) यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर गायकवाड आणि पोलीस हवालदार कुणाल पाटील यांनी महत्त्वाचे काम पाहिले.
0 Comments