परंडा |
सोशल मीडियाच्या जमान्यात गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांना आता नवीन मार्ग अवलंबावे लागत आहेत. अशाच एका घटनेत परंडा पोलिसांनी व्हाट्सअपवरील एका फोटोच्या आधारे अवैध शस्त्र जप्त करून तीन आरोपींना गजाआड केले आहे.
30 ऑगस्ट 2024 रोजी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस
निरीक्षक विनोद ईज्जपवार आणि सपोनि कविता मुसळे यांना
एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. या माहितीनुसार,
परंडा शहरातील शहाजी माळी याने आपल्या व्हाट्सअप
प्रोफाईलवर पिस्तूल हातात धरलेला फोटो ठेवला होता. ही
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत शहाजी
माळी यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेण्यात आली
असता त्याच्या कमरेला लावलेली एक गावठी पिस्टल (बंदूक)
आढळून आली.
याप्रकरणी पोलिसांनी शहाजी माळीसह ऋषीकेश गायकवाड
आणि ओंकार सुतार या तिघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम
कलम 3/25, 3(5) आणि भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा
दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संजय
जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय
पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक विनोद ईज्जपवार, सपोनि कविता मुसळे
यांच्यासह मपोह/ जिज्ञासा पायाळे, पोह/फिरोज शेख नितीन
गुंडाळे, पोअं/भांगे, राहुल खताळ, रजत चव्हाण, साधू शेवाळे यांच्या पथकाने केली आहे.
0 Comments