निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना जोर का झटका; ‘हा’ बडा नेता फुंकणार तुतारी?



विधानसभा निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार आहे. यासाठी सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत. महायुतीसह महाविकास आघाडी सध्या जागा वाटपबाबत फॉर्म्युला ठरवत आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत नेत्यांची इनकमिंग सुरू असल्याचं चित्र आहे. महायुतीमधील बऱ्याच नेत्यांनी पुन्हा आपल्या पक्षात घरवापसी केली आहे. तर, काही ठिकाणी उमेदवारी न मिळण्याचे संकेत मिळताच नेते मंडळी मविआच्या वाटेवर जात आहेत. आता जळगावमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. 

जळगावमधील बडा नेता शरद पवार गटात जाणार?
जळगावमधील बड्या नेत्याने शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचे समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर आता जळगावातही पक्षांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभेपूर्वीच अजित पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

अजित पवार गटाचे नेते, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील त्यांनी भेट घेतलीये. 

माजी आमदार दिलीप वाघ यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले. आता ते विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधत मोठं वक्तव्य केलंय. “मी शरद पवार आणि जयंत पाटील यांची मुंबईला भेट घेतली होती. चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निरीक्षक भास्कर काळे देखील पाचोर्‍यात आले होते. त्यांनी आमचा बूथ प्रमुखांचा मेळावा घेतला होता. आज चाळीसगावमध्ये शिवस्वराज्य यात्रा आलीये. शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी आम्हाला आमंत्रित केलंय.”, असं दिलीप वाघ म्हणाले.

माजी आमदार दिलीप वाघ यांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
इतकंच नाही तर, मला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल, यासाठी मी आशावादी असल्याचं देखील माजी आमदार दिलीप वाघ यांनी बोलून दाखवलं आहे. त्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात जाणार, अशा चर्चा आहेत. यामुळे अजित पवार यांचं मात्र टेंशन वाढणार आहे.

Post a Comment

0 Comments