फडणवीसांना मोठा झटका, ‘हा’ बडा नेता शरद पवारांच्या गळाला?



आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसह महाविकास आघाडी आता तयारीला लागली आहे. राजकीय नेत्यांचे राज्यात दौरे देखील सुरू झाले आहेत. त्यातच लोकसभेप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही उमेदवारीवरून नाराजीनाट्य दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकामध्ये मविआने महायुतीला चांगलाच धक्का दिला आहे. लोकसभेतील कामगिरीनंतर मविआ नेत्यांचा विश्वास देखील वाढला आहे. या निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटात अनेकांनी घरवापसी केलीये. तर, अजूनही काही परतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहे. भाजपातीलही अनेक नेते हे मविआसोबत जात आहेत.अशात भाजपला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.

हर्षवर्धन पाटील सोडणार भाजपची साथ?
गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे पक्षांतर करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच काल (27 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांमध्ये बैठक झाल्याची देखील माहिती मिळाली.या बैठकीमुळे या चर्चेला अजूनच उधाण आले.

मागील काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यातच त्यांची काल भेट झाल्याने या चर्चा अजूनच वाढल्या आहेत. कालच्या बैठकीत हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, ते अजून उघड झालं नाही.

9 बडे नेते शरद पवारांच्या गळाला?
मात्र, पवारांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील आगामी विधानसभेच्या निवडणुकांपूर्वीच भाजपला धक्का देऊ शकतात, असं म्हटलं जातंय. याचबरोबर अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील , पंढरपूरचे प्रशांत परिचारक , इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, पुण्यातील बापू पाठारे , भुईंजचे मदन भोसले आणि कागलचे समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या देखील मविआ  नेत्यांसोबत उमेदवारीसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे, अहमदनगरच्या कोपरगावातील राजकीय प्रस्थ विवेक कोल्हे यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे अहमदनगरमधूनही शरद पवार धक्का देणार, अशी चर्चा सुरू आहे. विवेक कोल्हे यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे या कोपरगावातून यापूर्वी आमदार राहिल्या आहेत. मात्र, 2019 मध्ये आशुतोष काळेंनी त्यांचा पराभव केला. आशुतोष काळे हे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांसोबत गेले आहेत. त्यामुळे विवेक कोल्हे यांना भाजपकडून तिकीट मिळणे जरा कठीण असल्याचं म्हटलं जातंय. यामुळे त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची माहिती आहे. 

Post a Comment

0 Comments