राज्यात अवघ्या काही दिवसांनी विधानसभा निवडणुक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तयारीला सुरवात केली आहे. अशातच आता राज्यातील अनेक बडे नेते महाविकास आघाडीकडे वळू लागले आहेत. यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, प्रशांत परिचारक यांसह अनेक नेत्यांच्या पडद्याआडून चर्चा सुरु असल्याचे दिसत आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत असलेले अनेक राजकीय नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . यामध्ये अकलूज येथील रणजितसिंह मोहिते पाटील , पंढरपूर येथील प्रशांत परिचारक , इंदापूर येथील हर्षवर्धन पाटील , पुण्यातील बापू पठारे, भुईंज येथील मदन भोसले याशिवाय कागल येथील समरजित घाटगे या प्रमुख नेत्यांच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत पडद्याआडून चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत अडीच वर्षांपूर्वी सरकार स्थापन केलं. कारण लोकसभा निवडणुकांमध्ये फायदा होईल असे त्यांना वाटले होते. मात्र त्यानंतर त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा देखील महायुतीमध्ये समावेश केला. गेले कित्येक वर्ष कट्टर विरोधक राहिलेल्या नेत्यांची अनेक मतदारसंघात लोकसभेसाठी मोट बांधण्यात होती . पण आता येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महायुती सरकारमधील अनेक दिग्गज नेते पुन्हा महविकास आघाडीकडे परतण्याच्या तयारीत आहेत.
कोणते नेते महाविकास आघाडीत सामील होऊ शकतात? :
१) भाजपचे विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात .
२) माढा विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
३) पंढरपूरचे प्रशांत परिचारक हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
४) सांगोला विधानसभा मतदारसंघातून दीपक साळुंखे हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
५) सातारा जिल्ह्यातील वाई – खंडाळ्याचे भाजपचे माजी आमदार मदन भोसले हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
६) फलटणचे आमदार दीपक चव्हाण हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
७) पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
८) पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापू पठारे हे तुतारी चिन्हाकडून निवडणूक लढवू शकतात.
९) कोल्हापूरचे राहुल देसाई हे काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत आहेत.
0 Comments