लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येऊन आता केंद्रात मोदी यांचं सरकार स्थापन झालं आहे. मात्र, तरीही राज्यातील काही लोकसभा मतदारसंघात जय-पराजयाची चर्चा थांबवण्याचं नाव घेताना दिसत नाही.
यात बीडचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. महाराष्ट्रात सर्वात उशिरा बीड लोकसभेचा निकाल लागला. अजूनही या निवडणुकीची चर्चा पाहायला मिळत आहे. अशात शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळजन दावा केला आहे.
माझ्या विजयामध्ये बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांचा वाटा असल्याचे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. माझ्या विजयाचं श्रेय बीड जिल्ह्याच्या जनतेला आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील 2 माणसांचा मी आभार मानणार आहे. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा माझ्या विजयामध्ये वाटा आहे. तर आदरणीय सुरेश धस यांचा वाटा देखील आहे, असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं आहे. ते बीडच्या केज येथे बोलत होते.
राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटाची साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते अजित पवार गटात होते. पण निवडणुका जाहीर होताच त्यांनी शरद पवार यांची तुतारी हाती घेतली. बीडमधील सभेत अजित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. बीडची लढत एकतर्फी होईल, असा अंदाज लावण्यात येत होता. तो बजरंग सोनवणे यांना खोटा ठरविला. कमी कालावधी उरलेला असताना त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. शरद पवार गट आणि महाविकास आघाडीने त्यांना भक्कम बळ दिले. त्यातच मराठा आरक्षण मुद्याचा त्यांना मोठा फायदा झाल्याचे दिसून आले.
0 Comments