अखेर अभिजीत पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या गळाला ; माढ्यामध्ये राष्ट्रवादीला धक्का


माढा |

राष्ट्रवादीचे नेते अभिजीत पाटीलयांनी  अखेर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांना मोठा दिलासा दिला आहे. तर ऐन निवडणुकीच्या आधी घडलेली ही राजकीय गुगली महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ करणारी ठरणार आहे. दरम्यान, अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सभासद आणि विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माढा आणि सोलापूरलोकसभेसाठी भाजपला पाठिंबा जाहीर केला.

याआधी चार दिवसांपूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेने 442 कोटी रुपयांच्या कर्जासाठी जप्तीची कारवाई केली होती. यानंतर अभिजीत पाटील यांनी भाजपला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा सोलापूरच्या राजकारणात सध्या सुरू आहे. याआधी कारखान्यावर ज्यांची सत्ता होती. त्यांच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाला. त्यामुळे मागील तीन वर्षांपासून कारखान्यावर शिखर बँकेची कारवाई सुरू असल्याचे पाटील यांनी या मेळाव्यात सांगितले.

यानंतर फडणवीसांनी तत्काळ निर्णय घेत कारखान्याला जीवनदान दिले. त्यामुळे आता आम्ही माढा मतदारसंघात रणजित निंबाळकरयांना तर सोलापूर मतदारसंघात राम सातपुते यांना पाठिंबा दिल्याचे पाटील यांनी यावेळी जाहीर केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर खेळली गेलेली ही खेळी महाविकास आघाडीला मात्र अडचणीत टाकण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अभिजीत पाटील यांनी पाठिंबा जाहीर केल्याने दोन्ही मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांचे बळ वाढणार आहे. माझी महत्वाकांक्षा बाजूला ठेऊन कारखाना टिकला पाहिजे. सोलापुरात ऊस दरासाठीची स्पर्धा अशीच पुढे सुरू राहिली पाहिजे. याद्वारे शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर मिळाला पाहिजे यासाठी आपण ही राजकीय भूमिका घेतली असल्याचे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post a Comment

0 Comments