मतदानाला गालबोट, दोन कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्लामहाराष्ट्रात पाचव्या म्हणजेच शेवटच्या टप्प्याचं लोकसभा मतदान पार पडत आहे. मतदानाच्या दिवशी भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवाराच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला झाला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या दोन कार्यकर्त्यांना जबर मारहाण करण्यात आली आहे.

मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतचे माजी सरपंच दौलत बांगर आणि जयवंत बांगर हे दोघं जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष आणि अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांचं काम करतात, या रागातून दोघांवर हल्ला केला गेला. दुपारच्या सुमारास भुवन पाडा रस्त्यावर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. तसंच त्यांच्या चारचाकी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.

हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांना मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा जीवघेणा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप निलेश सांबरेंच्या समर्थकांकडून केला जात आहे. सकाळपासून मुरबाडमध्ये मतदान शांततेत पार पडलं, पण दुपारनंतर तणाव निर्माण झाला. यामुळे मतदान शांततेत पार पाडण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांची कसोटी लागणार आहे.

Post a Comment

0 Comments