“गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद..”; ठाकरे गटाचा खळबळजनक दावा


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा रंगली आहे.नागपूरमध्ये नितीन गडकरी यांचा पराभव व्हावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र मिळून प्रयत्न केल्याचा दावा राऊत यांनी केलाय.

संजय राऊत  यांनी ‘सामना’मध्ये लिहिलेल्या रोखठोक या सदरात केंद्रीय राजकारणाबाबत मोठं भाष्य केलंय. यासोबतच उत्तर प्रदेशमधील निकालांबाबतही राऊतांनी या लेखाच्या माध्यमातून भाकित वर्तवलं आहे.

“एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात 25-30 कोटी..”
“अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील. त्यामुळे ‘योगी को बचाना है, तो मोदी को जाना है’ हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला. उत्तर प्रदेशात भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल. आधी मोदी-शहांना घालवा असे उत्तरेतील योगी व त्यांच्या लोकांनी ठरवले. त्याचा परिणाम 4 जूनला दिसेल”, असं लेखात म्हटलंय.

“दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडूक फुगवले व त्यांना नेते बनवले. ते सर्व नेते राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25-30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केले”, असा गंभीर दावा देखील सामनामधील लेखात करण्यात आलाय.

“गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनी रसद..”
लेखात देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील गंभीर आरोप करण्यात आले आहेत. “4 जूननंतर भाजपामध्ये मोदी-शाहांना पाठिंबा राहणार नाही. गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी-शाह-फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले. गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाइलाजाने नागपुरात प्रचारात उतरले. गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली हे संघाचेच लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसतात”, असं संजय राऊतांनी या लेखात म्हटलंय.

संजय राऊत यांच्या या धक्कादायक दाव्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. आता यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया उमटतात ते पाहावं लागेल. राज्यात निवडणुकांचे पाचही टप्पे पार पडले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा आता निकालावर लागून आहेत.

Post a Comment

0 Comments