पंढरपुरात पुरातन मंदिर संवर्धनाची कामे निकृष्ट दर्जाची

पंढरपुर |

सध्या पंढरपुरातील श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरासह परिवार देवतांच्या मंदिरांचे पुरातन मंदिर संवर्धनांतर्गत कामे चालु आहेत; परंतु सदर कामे ही कांही ठिकाणी निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला असुन आज स्वत: गणेश अंकुशराव हे प्रशासकीय अधिकारी व आपल्या कार्यकर्त्यांसह येथील लखुबाई मंदिराचे काम सुरु असताना त्याठिकाणी गेले व येथे काम करताना मुरुमाऐवजी मातीचा वापर होत असल्याचे अधिकार्‍यांना दाखवून दिले. यावेळी अधिकार्‍यांनी सदर कामे ही पुन्हा उत्कृष्ट दर्जाची केली जातील असे आश्‍वासन दिले.

पंढरपूर शहरात श्रीविठ्ठल व रुक्मिणी मंदिरासह शहर परिसरातील विविध परिवार देवतांच्या मंदिराची होत असलेली सध्याची कामं ही ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असुन पंढरपुर शहराची पुरातन ओळख दर्शविणारी आहेत. यासाठी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च होत आहे. येणार्‍या हजारो पिढ्यांना आदर्शवत ठरावी अशी विठुरायाची पंढरी नगरी पुन्हा एकदा नव्या झळाळीने आपले ऐतिहासिक, पारंपारिक अनमोल असं रुप अवतीर्ण होणार आहे. यासाठी गरज आहे श्रध्देने, निष्ठेनं आणि तत्वानं काम करणार्‍या अधिकारी व कमर्चार्‍यांची आणि हे सर्व काम प्रामाणिकपणे चोख करवुन घेणार्‍या ठेकेदार मंडळींची सुध्दा. परंतु सद्यस्थिती पाहता सध्या चालु असलेल्या विविध कामावर कुणाचाच अंकुश नाही हे स्पष्टपणे जाणवत आहे. जी कामे नको ती होत आहेत आणि जी कामं करायची तीच केली जात नाहीत किंवा निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. असा आरोप करत या कामाच्या विश्‍वासार्हतेबाबत गणेश अंकुशराव यांनी चिंता व्यक्त केली आहे.
 
सर्व नेते मंडळी लोकसभेच्या निवडणुक रणधुमाळीत गुंतलेली असताना घाई-गडबडीने केल्या गेलेल्या अलिकडच्या कांही कामाची पुन्हा एकदा जबाबदार अधिकारी, लोकनेते, समाजसेवक, पत्रकार या सर्वांनी प्रत्यक्ष पाहणी करावी व याची शहानिशा करावी अशी मागणीही यावेळी गणेश अंकुशराव यांनी यावेळी व्यक्त केली. पालकमंत्री बाहेरचे, खासदार बाहेरचे, अधिकारी बाहेरचे अन् मंदिर समितीचे सदस्यही बाहेरचे, इथले सदस्य आहेत  ते बिनकामाचे! असे विचित्र चित्रं सध्या मंदिर समितीचे असल्याने या कामाबाबत अनेक प्रश्‍नचिन्ह सामान्य पंढरपुरकरांसह वारकरी भाविकांच्या मनात आहेत. तरी मंदिरे समितीच्या अधिकार्‍यांनी पंढरीतील समाजसेवक, नेतेमंडळी, वारकरी व पत्रकारांची एक संयुक्त बैठक घेऊन आजपर्यंत झालेल्या कामाची व पुढे होणार्‍या कामाची इत्यंभुत माहितीही तातडीने द्यावी. अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन तर करुच पण याबाबत मोठा जनजागर करु. असा इशाराही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. यावेळी सुरज कांबळे, अर्जुन अभंगराव, धनंजय अधटराव, तात्या अधटराव, बालाजी कोळी, ह.भ.प. गोपाळ महाराज ठाकुर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments