बार्शी |
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच ज्यांना महायुतीकडून उमेदवारी दिली गेली त्यांच्यावर इतर पक्षाच्या नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करत उमेदवारी मिळवलेल्या अर्चना पाटील यांनी एक विधान केले आहे. त्यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर तातडीने अर्चना पाटील यांनी प्रचाराला सुरूवात केली. त्यावेळी धाराशिव लोकसभा मतदारसंधाच्या बार्शी विधानसभा मतदारसंघात अर्चना पाटील आल्या होत्या. प्रचारादरम्यान अर्चना पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी अर्चना पाटील यांना बार्शीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा फारसा प्रभाव दिसत नाही. इथे पक्षाचं वर्चस्व कसं वाढवणार? असा प्रश्न विचारण्यात आला. याच प्रश्नावर अर्चाना पाटलांनी दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
“मी कशाला वाढवू? मला तर काही कळतच नाही. मी महायुतीची उमेदवार आहे. मी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि एनडीए 400 पार करण्यासाठी निवडणूक लढवत आहे. राजेंद्र राऊत महायुतीचे घटक आहेत. माझे पती स्वत: भाजपाचे आमदार आहेत. मला त्यांनी इथून तिकीट दिलं आहे. मी इथे भगवंताच्या दर्शनासाठी आले आहे. मी निवडून येणार आहे. राजेंद्र राऊत यांचा मला भावासारखा पाठिंबा आहे. त्यामुळे इथे माझा पक्ष म्हणजे महायुतीच वाढणार आहे”, असे उत्तर अर्चना पाटील यांनी दिले.
0 Comments