बार्शी तालुक्याचा गंभीरदुष्काळी तालुका यादीत समावेश



बार्शी |

 राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये एकूण ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये आ. राजेंद्र राऊत यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून बार्शी तालुक्याचा गंभीर स्वरूपाचा दुष्काळी तालुका यादीत समावेश करण्यात आला आहे.

राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पीकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेवून सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, माळशिरस, सांगोला या तालुक्यांचा गंभीर दुष्काळी तालुका म्हणून व करमाळा, माढा या तालुक्यांचा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ म्हणून समावेश करण्यात आला आहे.

आज मंत्रिमंडळ बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने पीक पाणी परिस्थितीच्या आढाव्यात दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भातील परिस्थितीची माहिती दिली. यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ मधल्या तरतुदीनुसार अनिवार्य निर्देशांक आणि प्रभावदर्शक निर्देशांक विचारात घेण्यात आले आहेत.  

बार्शी तालुक्याचा दुष्काळी यादीत समावेश झाल्यामुळे पुढील सवलती मिळणार आहेत :- जमीन महसुलात सवलत, पिक कर्जाचे पुर्नगठन, शेतीशी निगडित कर्जाच्या वसूलीची स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थांचे परीक्षा शुल्क माफ, रोजगार हमी योजने अंतर्गत कामाच्या निकषात काही अंशी शिथिलता, आवश्यक तिथे पिण्याचे पाणी टॅंकरने पुरवण्याची मुभा, टंचाई झालेल्या भागातील शेतक-यांच्या शेतीतील वीजपंपांची वीज खंडीत न करणे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बार्शी तालुक्याचे वतीने आ. राजाभाऊ राऊत यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments