जिल्ह्यात पहिल्यांदा खासदार कपिल पाटील यांच्या रूपाने केंद्रीय मंत्रीपद मिळाले. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना पंचायत राज राज्य मंत्रीपद मिळाल्याने त्यांनी देशभरातील अनेक राज्यातील गाव-पाड्यांना भेटी देत विकास कामाचा धडका लावला असतानाच, त्यांच्या नावाने अज्ञात ठगाने फेसबुकवर अकाऊंट उघडून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली जात असल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यावतीने भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात ठगाविरोधात सायबर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फेक फेसबूक अकाऊंटवरून पैशांची मागणी - गेल्या काही दिवसापासून केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे नावाने फेक फेसबूक अकाऊंट उघडून, अज्ञात ठगाकडून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या जात असल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. विशेष म्हणजे याच फेसबुक अकाऊंटवरून समोरच्या व्यक्तीला ऑनलाईन पैशांची मागणी केली जात आहे. अश्याच एका तरुणाला मंत्री महोदयांच्या बनावट फेसबुक अकाऊंड वरून १५ हजार रूपयांची मागणी करण्यात आल्यानंतर हा प्रकार समोर हे बनावट अकाऊंट कुणीतरी चालवत असल्याचा संशय आला. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाकडून नारपोली पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्या अंतर्गत अज्ञात ठगावर तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, त्या बनावट फेसबुक अकाऊंटवरून आलेल्या रिक्वेस्ट कोणीही स्विकारू नयेत. तसेच कोणीही पैसे पाठवू नयेत. आपल्याबाबतीत असा प्रकार झाला असल्यास, तातडीने केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
0 Comments