नवी दिल्ली/प्रतिनिधी:
'मिस युनिवर्स २०२१'चा खिताब जिंकत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या २१ वर्षीय हरनाज संधूने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
पराग्वे आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशातील स्पर्धकांना मागे टाकून तिने हा बहुमान मिळवला आहे. हरनाजच्या विजयाची बातमी मिस युनिवर्स ऑर्गनायझेशनच्या अधिकृत इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आली.
इस्रायलमधील इलात येथे झालेल्या ७०व्या 'मिस युनिवर्स २०२१' ही स्पर्धा पार पडली. इस्रायलमध्ये आयोजित कार्यक्रमात हरनाजला मुकुट घातला गेला तो क्षण त्यांनी शेअर केला आहे. "नवीन मिस युनिवर्स आहे.इंडिया," असं कॅप्शन त्या व्हिडिओला देण्यात आले. क्लिपमध्ये मेक्सिकोची 'मिस युनिव्हर्स २०२०' आंद्रिया मेझा भावनिक झालेल्या हरनाजला मुकुट घालताना दाखवली आहे.
हजरजबाबी उत्तरामुळे मिळाली आघाडी
आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये तिला काही प्रश्न विचारण्यात आले, तो प्रश्न असा होता की "बर्याच लोकांना हवामान बदल ही फसवी वाटते, पण ही गोष्ट त्यांना पटवून देण्यासाठी तुम्ही काय कराल?" या प्रश्नावर उत्तर देताना "निसर्ग अनेक समस्यांमधून जात आहे हे पाहून माझे हृदय हळहळते आणि हे सर्व आपल्या बेजबाबदार वर्तनामुळे आहे. मला पूर्णपणे वाटते की हीच वेळ आहे कृती करण्याची आणि कमी बोलण्याची. कारण तुमची प्रत्येक कृती निसर्गाला वाचवू शकते किंवा नष्ट टाकू शकते. पश्चात्ताप करण्यापेक्षा आपल्या चुकीमध्ये दुरुस्ती करणे जास्त चांगले आहे." हरनाजच्या या उत्तरावर उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. या हजरजबाबी उत्तरामुळे तिने 'मिस युनिवर्स' खिताब पटकवण्यात आघाडी घेतली.
कोण आहे हरनाज
चंदीगडच्या हरनाज संधूचा जन्म शीख कुटुंबात झाला. फिटनेस आणि योगाची आवड असलेल्या हरनाझने किशोरवयातच सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले असून ती पब्लिक एडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी घेत आहे. तिने २०१७ मध्ये 'टाइम्स फ्रेश फेस बॅक'सह तिच्या सौंदर्य स्पर्धेचा प्रवास सुरू केला. २०१७ मध्ये तिने 'मिस चंदिगड'चा खिताब जिंकला होता. २०१८ मध्ये तिला 'मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडिया २०१८' चा अवॉर्ड मिळाला होता. दोन प्रतिष्ठीत खिताब जिंकल्यानंतर हरनाजने 'मिस इंडिया २०१९' मध्ये भाग घेतला. त्यामध्ये ती टॉप १२ मध्ये पोहोचली होती. याशिवाय तिच्याकडे 'फेमिना मिस इंडिया पंजाब २०१९' सारखी अनेक स्पर्धा खिताब आहेत. नुकताच सप्टेंबरमध्ये तिने 'मिस दिवा युनिवर्स इंडिया २०२१' चा मुकुट पटकावला.
हरनाज ठरली भारताची तिसरी मिस युनिव्हर्स
'मिस युनिवर्स' स्पर्धेत भारताला आतापर्यंत केवळ दोनच वेळा बहुमान मिळाला होता. हरनाज ही भारताची तिसरी 'मिस युनिवर्स' ठरली आहे. यापूर्वी २००० मध्ये बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताने हा खिताब जिंकला होता. आता २१ वर्षांनंतर हा मान पुन्हा भारताला मिळाला आहे. त्याआधी १९९४ मध्ये सुष्मिता सेन हिला हा खिताब मिळाला होता.
0 Comments