बार्शी शहरात आमदार आपली दारी अभियान अंतर्गत व विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी आमदार राजाभाऊ राऊत यांना नागरिकांकडून खंडित पाणीपुरवठा व पाणी सोडणारे कर्मचारी ( वाॅल्व्ह ओपनर ) यांच्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांनी शुक्रवार दिनांक २९ ऑक्टोंबर रोजी बार्शी नगर परिषदेत महावितरणचे अधिकारी व पाणी सोडणारे कर्मचारी (वॉल्व्ह ओपनर) यांची संयुक्त आढावा बैठक घेतली.
या बैठकीत कुर्डुवाडी व कंधार येथील सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे, बार्शी शहराला उजनी येथून होणारा पाणीपुरवठा खंडीत होत आहे. या खंडित वीज पुरवठ्यामुळे सतत पाणी गळती होत असून याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होत असल्यामुळे सणा-सुदीच्या काळातही नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे, त्यामुळे हा वीज पुरवठा सुरळीत करण्यावर ठोसपणे काम करावे अशा सूचना आमदार राजाभाऊ राऊत यांनी संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
त्याचबरोबर बार्शी शहराला पाणी सोडणारे कर्मचारी ( वॉल्व्ह ओपनर ) यांनाही त्यांनी, नागरिकांना नम्रपणे सामोरे जाऊन पाणीपुरवठ्या बद्दल समस्या असल्यास त्यांना समजून सांगून, त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागण्याच्या सक्त सूचना केल्या.
या बैठकीस नगराध्यक्ष ॲड.असिफभाई तांबोळी, मुख्याधिकारी सौ. अमिता दगडे पाटील मॅडम, नगरसेवक विलास आप्पा रेनके, दीपक राऊत, संतोष भैय्या बारंगुळे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनोद घोलप, उपकार्यकारी अभियंता अरविंद भाग्यवंत, जलदाय अभियंता अजय होनखांबे व कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments