पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम PPE किट घालून सहकारी आधिकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी थेट रुग्णालयात


 
सोलापूर/प्रतिनिधी:

शहरातील एका खासगी रुग्णालयातील आयसीयू (अतिदक्षता विभागात) उपचार घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या तब्येची विचारपूस करण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पीपीई कीट परिधान करून त्या पोलीस अधिकाऱ्याची भेट घेतली. गरज पडल्यास कुठेही नेऊन उपचार करू असा विश्वास सातपुते यांनी संबंधित सहायक पोलीस निरीक्षकाच्या कुटुंबीयास दिला. वळसंग पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश ढाले (वय ५६) यांना कोरोनाची लागण झाली.त्यांच्यावर सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

उपचारासाठी प्रतिसाद देत नाहीत… उपचाराला ते कंटाळलेत… सारखं सारखं नकारात्मक बोलतात याबाबतची माहिती संबंधित डॉक्टरांनी पोलीस अधीक्षकांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षक सातपुते यांनी तत्काळ त्या पोलीस अधिकाऱ्याची समजूत काढून एक प्रकारचा विश्वास देण्याच्या उद्देशाने स्वत: पीपीई कीट घालून कोरोना वाॅर्डात त्या अधिकाऱ्याची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गरज पडल्यास कुठेही उपचारास नेऊ

सहायक पोलीस निरीक्षकावर उपचार सुरू आहेत. औषधे, इंजेक्शन, ऑक्सिजन, आदी महत्त्वाच्या आरोग्य सेवासुविधा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना मिळत आहेत. हॉस्पिटल प्रशासनास उपचारासाठी काही अडचण आल्यास त्यांनाही ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी मदत करीत आहेत. त्यांच्यावर येथील रुग्णालयात व्यवस्थित उपचार सुरू आहेत. गरज पडल्यास मुंबई किंवा अन्य मोठ्या शहरात उपचारासाठी दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

भेटायला येऊ…काळजी करू नका…

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सहायक पोलीस निरीक्षक ढाले यांची भेट घेऊन उपचारांबाबत विचारपूस केली. काही काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे व्हाल…औषधोपचार वेळेत घ्या…सकारात्मक विचार करा…डॉक्टर जे सांगतील त्याला प्रतिसाद द्या…आम्ही तुम्हाला सारखं सारखं भेटायला येऊ अशा प्रकारचा विश्वास पोलीस अधीक्षक सातपुते यांनी ढाले यांना दिला.

वळसंगचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश ढाले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मी स्वत: त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. डॉक्टरांकडून उपचारांबाबत माहिती घेतली. डॉक्टरांशी बोलणे झाले. ढाले हे लवकर बरे होतील अन् पुन्हा सेवेत दाखल होतील.

– तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

Post a Comment

0 Comments