क्रिकेटमध्ये नव्हे तर घरफोडीमध्ये ठोकले शतक....


क्रिकेटमध्ये धावांचे शतक आपल्याला माहिती आहेच पण एखाद्या सराईत गुन्हेगाराकडून घरफोडीच्या गुन्ह्यांची ‘सेंच्युरी’ होऊ शकते का ? तर त्याचे उत्तर हो असे आहे. घरफोड्यांची ‘सेंच्युरी’ ठोकणाऱ्या एका सराईतास पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध एक, दोन नव्हे तर तब्बल १०० गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०१६ मध्ये घरफोडीचे गुन्हे घडले होते. त्यातील सराईत गुन्हेगार भिवंडीतील काल्हेर परिसरात राहत असल्याची खबर गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकास मिळाली होती.

पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलिस निरीक्षक वैशाली भोसले, पोलिस उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी कुंभारला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून ९ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याच्याविरुद्ध शहरात विविध पोलिस ठाण्यात चार गुन्हे आहेत. त्याचबरोबर त्याने साथीदारांच्या मदतीने पुण्यासह सातारा, कोल्हापूर, नगर, औरंगाबाद, नाशिक शहरांमध्ये १०० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

बंद घरांची पाहणी करून सुरक्षारक्षक नसल्याची खात्री केल्यानंतर तो कटावणीच्या सहाय्याने घरांचे कुलूप तोडत त्यानंतर तेथे चोरी करीत होता. अटक केलेल्या सराईत रमेश महादेव कुंभार (वय ४३, रा. काल्हेर, भिवंडी) असे चोरट्याचे नाव आहे. अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप, यशवंत आंब्रे, कादीर शेख, समीर पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments