जिल्हा माहिती अधिका-याचे कोरोनाने निधन, चार जिल्ह्यात केले काम


पुणे : जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज शनिवारी पहाटे कोरोनाने निधन झाले. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरग यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान, वाढलेली त्यांची शुगर शेवटपर्यंत कमी न झाल्याने अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

उपमुख्यमंञी अजित पवार यांनी सरग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. नाशिकमधील नांदगाव हे त्यांचे मूळगाव, तर औरंगाबादला त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण झाले. प्रारंभी पत्रकारिता केल्यानंतर ते शासकीय सेवेत रूजू झाले. बीड, परभणी, नगर आणि पुणे या चार जिल्ह्यात त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि कार्यतत्परता या गुणांमुळे ते अधिकारी वर्गासोबतच तमाम पत्रकारांमध्ये खूप लोकप्रिय होते.

राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचाही छंद होता. अनेक वर्षांपासून काही दैनिक, साप्ताहिक तसंच दिवाळी अंकांमधून त्यांची व्यंगचिञ प्रसिद्ध होत असत. बालगंधर्वला त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शनही भरले होते. आताही गेल्या वर्षभरापासून कोरोना शासकीय आकडेवारी आणि उपाययोजनांची माहिती ते न चुकता पत्रकारांपर्यंत पोहोचवायचे आणि अगदी त्यांच्यावर उपचार सुरू असतानाही ते रोज संध्याकाळी न चुकता पुणे जिल्हा माहिती अधिकारी ग्रुपवर कोरोनाच्या आकडेवारीचा संदेश पाठवायचे. पण दुर्दैवाने त्याच कोरोनाने आज त्यांचा बळी घेतला आहे. २९ एप्रिलचा त्यांचा रात्री ९.३२ मिनिटांचा शेवटचा संदेश पत्रकार मित्रांना खूप हळवा करून करून गेला.

गेल्याच आठवड्यात त्यांची कोरोना टेस्ट पॉजिटिव्ह आल्यानंतर प्रारंभी त्यांनी हडपसरच्या आधार हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. पण प्रकृती खालावताच त्यांना ससूनच्या आयसीयूत हलवण्यात आलं. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी स्वत: डॉक्टरांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डॉक्टरही शर्थीचे प्रयत्न करत होते, पण अखेर हे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले.

Post a Comment

0 Comments