पंढरपूर/प्रतिनिधी:
तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यांन्याने डिसेंबर मध्ये गळीत झालेल्या उसाचे बिल अद्याप न दिल्यामुळे सभासद मारूती पाटील या शेतकऱ्यांने कारखान्याचे संस्थापक कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील यांच्या पुतळ्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
ऐन पोटनिवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे उमेदवार व विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पंढरपूर तालुक्यातील तिसंगी येथील ऊस उत्पादक शेतकरी मारूती रामचंद्र पाटील यांचे नावे विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेनुनगर गुरसाळे या कारखान्यास मागील चार महिन्यापूर्वी १०६ टन ऊस गळीतास दिला होता. परंतु कारखाना व्यवस्थापनाने सदर शेतकऱ्याचे ऊस बिल अद्याप दिलेले नाही. त्यामुळे सदर शेतकऱ्यांने मागील दोन दिवसापूर्वी कारखाना स्थळावर उषोषण करणार असल्याचे लेखी निवेदन दिले होते.
या निवेदनात पाटील यांनी ७ तारखेपर्यंत माझे उसाचे बिल न मिळाल्यास आमरण उपोषण करणार असून माझ्या जिवीतास बरेवाईट झाल्यास याची जबाबदारी ही कारखाना व्यवस्थापनाची असेल म्हटंले होते. मात्र कारखाना प्रशासनाने या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे सदर सभासद शेतकऱ्यांने संस्थापक कर्मवीर औदूंबर आण्णा पाटील यांच्या पुतळ्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
मागील वर्षी संचालक मंडळाच्या गलथान कारभारामुळे कारखाना बंद ठेवण्याची नामुष्की आली होती. तर यावर्षी मोठा गाजावाजा करीत गळीत हंगाम सुरु केला मात्र सभासदांनी ऊस गळीतास देण्यासाठी प्रतिसाद न दिल्यामुळे कारखान्याचा गळीत हंगाम आटोपता घ्यावा लागला. तर याही वर्षी शेतकऱ्यांना १४ दिवसात बिल देणे गरजेचे असताना ४ महिन्यांनंतर ही बिले थकीत असल्यास शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे.
ऊस बिल मिळाल्याशिवाय नाही उठणार
माझी आर्थिक अडचण मोठी असून माझ्याकडे अनेकांचे हात उसने पैसे आहेत. त्यामुळे ते लोक माझ्या घरी येऊन बसू लागले आहेत. त्या लोकांना पैसे देणे गरजेचे असल्याने मी पैसे दिल्याशिवाय अण्णांच्या पुतळ्यासमोर उठणार नाही.याच ठिकाणी माझा प्राण गेला तरी चालेल.
–मारुती पाटील,तिसंगी
0 Comments