मुंबईतली मायानगरी यूपीला हलवण्याचा योगी आदित्यनाथांचा प्रयत्न असल्याचा दावा करत शिवसेनेने योगींना लक्ष्य केले आहे. कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही. असा हल्लाबोल शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातील अग्रलेखात केला आहे.
योगींना लवकरात लवकर मायानगरीचा मुहूर्त करायचा आहे व त्यासाठी त्यांनी घाई सुरू केली आहे. प्रख्यात खिलाडी अक्षय कुमार योगींना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते. असो. हा झाला गमतीचा भाग. आणखीही कोणी कलावंत आणि इतर मंडळी त्यांना भेटली असतील. चांगली गोष्ट आहे.
योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉकडाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत.
0 Comments