माढा/प्रतिनिधी:
माढा तालुक्यातील बावी येथे तुरीच्या पिकामध्ये चक्क गांजा पिकाची लागवड केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बावी येथील दोघांवर माढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात सुमारे १३४ किलो वजनाचा ६ लाख ६९ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे.याप्रकरणी हवालदार प्रकाश शिवाजी मांजरे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की माढा तालुक्यातील बावी येथे शेतात तुरीच्या पिकांमध्ये गांजा झाडाची लागवड करून जोपासना करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रविवारी बावी येथील मोरे यांच्या शेतात पोलिसांनी धाड टाकली. याप्रकरणातील संशयित आरोपी बंडू औदुंबर मोरे (वय ४८ ) व जरीचंद विश्वनाथ कुंभार (दोघे रा.बावी, ता. माढा) यांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनीमध्ये तुरीच्या पिकामध्ये गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची जोपासना केली. गांजाची ही झाडे २ ते ५ फूट उंचीची असून त्यांचे वजन १३३ किलो ९०० ग्रॅम आहे. याची अंदाजे किंमत ६ लाख ६९ हजार ५०० रूपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्यात बंडू औदुंबर मोरे यास अटक करण्यात आली आहे.
त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने, पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मारुती लोंढे, शेख, प्रकाश मांजरे, संदेश शिकतोडे, सुनील भोसले, पांडुरंग देशमुख, अंगद नलवडे यांच्या पथकाने छापा टाकला होता.
0 Comments