✍️युवराज बाबासाहेब औंधकर (मुख्यमंत्री फेलो, महाराष्ट्र)
माझं प्राथमिक शिक्षण उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचोलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झालं. मला घडवण्यात अनेक व्यक्तिमत्वाचा हात आहे. माझ्या आयुष्यातील प्रभावशाली व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे आमचे शिक्षक गुंजाळ गुरुजी. गुंजाळ गुरुजी आमचे वर्गशिक्षक असायचे. गुरुजींकडे शिकवायला इंग्रजी आणि गणित हे विषय असायचे. दोन्ही विषयांवर गुरुजींची जबरदस्त पकड होती. आपल्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत चिंचोली गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून विद्यार्थी घडवले. कडक इस्त्रीची पांढरी विजार व पांढरा शर्ट घालणाऱ्या गुरुजींची उंची साधारण पावणेसहा फूट असेल. लगेच उठून दिसणाऱ्या गुरुजींचे व्यक्तिमत्त्व गावातच नव्हे तर तालुक्यात प्रसिद्ध होते. चिंचोली गावात गुरुजींना ओळखत नाही असा एकही माणूस गावात शोधून सापडायचा नाही. विनोदी,मनमिळाऊ, लाघवी स्वभाव वैशिष्टयामुळे विद्यार्थ्यांबरोबरच गावकऱ्यांच्या मनावरही गुरुजी अधिराज्य करत होते.
गुरुजींचं आणि विद्यार्थ्यांचं वेगळंच नातं होतं. त्यात गुरुजी आमचे वर्गशिक्षक असल्याने आम्ही जास्त जवळचे असायचो. आम्हाला इंग्रजी अन गणित विषय आवडायचे नाहीत मात्र गुरुजींमुळे आम्ही तासाला बसायचो. गुरुजींचा असा एकही तास गेला नाही की त्या तासाला गमतीजमती झाल्या नाहीत. त्यांनी केलेल्या अनेक विनोदावर आम्ही बेंबीच्या देठापासून हसायचो म्हणून आम्हाला त्यांचा तास म्हणजे एक पर्वणीच वाटायची.
वर्गात येताना गुरुजींनी मुद्दामहुन केलेली नक्कल असो, चेहऱ्यावर केलेले वेगवेगळे हावभाव असो वा वर्गात शिकवताना केलेले विनोद असो आम्ही मनसोक्त असायचो. गरुजींचं विनोद अंग होतच मात्र शिकवण्याच्या बाबतीत त्यांचा हातखंडा जबरदस्त होता. अभ्यास,गृहपाठ, हजेरी याबाबत गुरुजी गंभीर असायचे. शाळा बुडवली, आगाऊपणा केला, अभ्यास नाही केला तर छडी न वापरता पाटीत जोरात धपाटा मारत.
तसं गुरुजींचं आणि माझं वेगळं नातं होतं. गुरुजींना चहा फार आवडायचा. शाळेपासून हाकेच्या अंतरावर घर असल्याने कोणी पै पाहुणे आले तर गुरुजींना हमखास चहा असायचाच. कित्येक वेळा गुराजीही आवडीने घरी चहा घ्यायला यायचे. माझ्या हाताने दूध असेल तर दुधाचा आणि नसेल तर कोरा चहा बनवून आम्ही चहा प्यायचो. गुरुजी चहा चे अफाट फॅन होते हे अख्या गावाला माहिती असायचं. नंतर मधुमेह झाला असतानाही सर बिन साखरेचा चहा प्यायचेच.
मला अजूनही एक प्रसंग फार आठवतो आणि आयुष्यभर आठवणीत राहील असाच आहे.
असंच दुपारची वेळ होती, आई आण्णा गावाला गेल्याने शाळेला दांडी मारून घरीच बसलो होतो. घरापासून शाळा जवळ असल्याने मनमोकळं खेळताही येत नव्हतं. बाहेर पडावं तर सुरवसे सर(मुख्याध्यापक) बघतील उगाच प्रकरण वाढायचं म्हणून घरातच होतो.
एवढ्यातच वर्गमित्रांना घेऊन गुरुजी दारात आले. त्यांनी आवाज दिली,"युवराजे आहेत का घरात?" मला बाहेर यावच लागलं. तेवढ्यात गुरुजींनी माझी मज्जा घ्यायला सुरुवात केली. मित्रांच्या मदतीने मला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं आणि चहा पिऊन यायचा हे अगोदरच ठरलेलं असणार. गुरुजी म्हणाले,"हे घर कुणाचं?" मित्र म्हणायचे,"आपल्या युवराजेंचं", गुरुजी म्हणायचे,"हे शेत कुणाचं?" मित्र म्हणायचे,"आपल्या युवराजेंचं", गुरुजींच्या ह्या बोलण्याने माझी छाती फुगत गेली मी म्हणालो," गुरुजी थांबा आता, चहा घेऊनच जावा." गुरुजी म्हणाले,"आपले युवराज फार छान आहेत बरं, बघा किती काळजी घेतात आपली." मी चहा केला. मस्तपैकी आम्ही चहा पिऊन गुरुजी व मित्र निघणार इतक्यात मी म्हणालो,"गुरुजी उद्या वर्गात आल्यावर शाळेला आलो नाही म्हणून उठुवू नका, आणि मारू पण नका." गुरुजी म्हणाले," अहो तुम्हाला कोण मारतंय, या उद्या शाळेत." शाळा बुडवली म्हणून गुरुजी मारणार नाहीत याचा वेगळाच आनंद होता. दुसऱ्या दिवशी निडर पणे वर्गात जाऊन बसलो, गुरुजींनी हजेरी घेऊन शाळेला दांड्या मारलेल्या मुलामुलींना उभं राहायला सांगितलं, मी बिनदास्त बसलो होतो. मी चहा पाजल्यामुळे मी नाही उठलो तरी चालतंय म्हणून तसाच बसून होतो. मी तसाच बसलेला पाहून गुरुजी जीभ बाहेर काढून पळत आले आणि पाठीत एक जोराचा दणका देऊन म्हणाले,"काल शाळेला आला नाही आणि खालीच बसतंय हे, उभं राहायचं कळत नाही का? उठ.." मी पाठ चोळत उठलो. मला राग आला त्या रागाच्या भरातच मी म्हणालो," सर! आजपासून तुमचा चहा बंद!" तसाच रडत खाली बसलो. आपल्या गुरुजींकडून मार खाल्ल्याचं वाईट वाटत होतं. तास संपल्यावर गुरुजी भेटले म्हणाले," युवराज! मला माहितीय तुला वाईट वाटलं पण आम्हाला कधीच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करता येत नाहीत, शिक्षकांना सगळी मुलं सारखीच, वाईट वाटून घेऊ नको." मी काहीच न बोलता निघून गेलो.
कालांतराने असेच दिवस निघून गेले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून आमचं सीमोल्लंघन झालं आणि आमचं शाळेमधलं एक पर्व संपलं.नंतर मीही शिक्षणासाठी कोल्हापूरची वाट धरली. कोल्हापूर ला गेल्यावर वैचारिक प्रगल्भता आली. गावकडंच बालपण,माणसं, शाळा ,शिक्षक सारखं आठवायचं. असेच एकदा भूमला आल्यावर अचानक गुरुजींची भेट झाली, वय झालं होतं,शरीर थकलेलं होतं, मी लगेच नतमस्तक झालो. डोक्यावरून हात फिरवून गुरुजींनी कौतुक केलं आणि म्हणाले,"युवराज नंतर चहा पाजलाच नाही बघ तू." हे ऐकताच माझ्या डोळ्यात पाणी आलं. नंतर काळाच्या ओघात गुरुजींची भेट झालीच नाही. अशीच एकदा बातमी आली की गुंजाळ गुरुजी गेले. मन विषण्ण झाले. माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना गुरुजींनी घडवलं. माझं गुरुजनांशी जे अनौपचारिक व जिव्हाळ्याचं नातं असायचं त्यातलं 'गुंजाळ गुरुजी' हे एक सोनेरी पान आहे.
आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात 'गुरू-शिष्याचं' नातं जिवंत आहे का? आजची पिढी खरंच बालपण जगते का? असे अनेकांगी प्रश्न मनात आले. मोबाईल गेम,सोशल मीडिया, TV यामुळं बालकांचं बालपण संपलंय हे नक्की. पालक-बालक, गुरू-शिष्य यांच्यातील संवाद संपत चाललाय हे नक्की.
1 Comments
छान युवराजे.. गुरुजींच्या आठवणी जाग्या झाल्या 🙏
ReplyDelete