कोरोना आणि ग्रामीण भागातील गटातटाच राजकारण


✒️अभिजित कोतोलीकर

            कोरोनाचं संकट गेली 5 महिन्यापासून देशात सर्वत्र तैमान घालत आहे. सुरुवातीला देशातील मोठ्या शहरांत प्रवेश केलेल्या कोरोनापासून छत्रपती शाहू राजांची पावनभूमी असणारं 'कोल्हापूर" काहीसं दूरच होतं. सुरुवातीचे काही दिवस कोल्हापूर शहरात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला  नाही, मधल्या काळात लॉकडाऊन उठलं आणि कोरोनाने हाहाहाहा म्हणता शंभरी गाठली, येव्हाना शहरा पुरता मर्यादित राहिलेला कोरोना नकळत जिल्ह्यातील खेड्यात कधी येऊन पोहचला कुणालाच कळलं नाही. हसण्यावारी घेतलेला कोरोना जेव्हा उंबरठ्यावर येऊन बसला तेव्हा मात्र खेड्यातील भाबड्या लोकांच्या तोंडचं पाणीच पळालं. सधन जिल्हा म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेल्या जिल्ह्यातील लोकांची येन पावसात शेतीच्या कामाची एकच लगबग सुरू असतानाच कोरोनाच्या या संकटाने इथल्या प्रत्येकाच्या मनात भीतीनं घर केलं. 

         4 महिने खेडयातील निवांत असणारी ग्रामीण आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टर्स, नर्स, इतर सर्व स्टाफ यांची तारेवरची कसरत सुरू झाली. इतके दिवस गावातील आशा स्वयंसेविका गावातील प्रत्येक घरात जाऊन आजारी कोण आहे का?  याची विचारपूस करून येत होत्या, पण आता मात्र गावात प्रत्यक्ष रुग्ण सापडत आहेत. ग्रामीण भागातील एखाद्या गावात एक रुग्ण सापडला तरी, संपूर्ण गावात निरव शांतता पसरत आहे. 
      
        आरोग्य यंत्रणेच्या या संपूर्ण टीम सोबत गावातील सर्कल,तलाठी, ग्रामसेवक, सरपंच , ग्रामपंचायत सदस्य व या काळात गावात कार्यरत असणारी कोरोना दक्षता समिती कोरोनाच्या या लढाईत प्रत्यक्ष रस्तावर उतरली आहे. हे सगळं अगदी सुरळीत सुरू असतानाच खेड्यातील राजकारणाने मात्र चांगलीच उसळी घेतली आहे. 
    
       जिल्ह्यातील अनेक गावं अतिशय धोक्याच्या स्थितीतुन  जात आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण सापडत आहेत, हे मान्य करण्याची मानसिकता सध्या कोणाचीही नाही, जे नागरिक पॉझिटिव्ह येत आहेत, ते त्यांच्या संपर्कातील व्यक्तीची नावं सांगत नाहीत, जे संपर्कात आहेत ते स्वतः पुढं येत नाहीत, जे बाधित आहेत ते राजेरोसपणे सर्वत्र फिरत आहेत गावच्या बाहेर जात आहेत. या सगळ्याला कारणीभूत जरी स्वतः एखादी व्यक्ती असला तरी हे सगळं करण्याला आणि या गोष्टीला फूस लावायला कोण असेल तर ज्यांना आपण आपलं माणूस म्हणून निवडून दिलं ती आमची तात्या, दादा, भाऊ, साहेब अशा फुकटच्या पदव्या संपादन केलेली नेते मंडळी. आज गावातील मंडळी कोरोनाला अजिबात घाबरत नाहीत, फक्त घाबरत आहेत ते गावतील पुढाऱ्यांनी मांडलेल्या फुकटच्या बाजाराला, त्यांना आपल्याला कोरोना होईल याची भीती अजिबात नाही, त्यांना भीती आहे या राजकारणी लोकांचा फुकटचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या आपल्या लेकरांची, त्यांना भीती आहे गुण्यागोविंदानं नांदणाऱ्या आपल्या गावात, भावकित वैर तर निर्माण होणार नाही ना ! याची. भीती आहे राज्याच्या नकाशावर ताठ मानणं उभं असणार आपल्या गावाची या पुढाऱ्यामुळे नाहक बदनामी तर होणार नाही ना?? याच भीतीने खेड्यातील प्रत्येक माणूस आज भयभीत झालाय. या भयभीत झालेल्या माणसांकडे मात्र या पुढाऱ्यांनी कानाडोळा करून आपला हा धंदा सुरूच ठेवला आहे.

     कोरोनाच्या जागतिक महामारातील अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. आयुष्यभर तात्या, दादा,भाऊ, साहेब म्हणून ज्यांनी यांचा झेंडा मिरवला त्या आपल्या सामान्य कार्यकर्त्यांची बंद असणारी चूल त्यांच्या नजरेस कधीच येत नाही, कारण त्याला मदत करून त्याची जाहिरात त्यांना करता येत नाही, पण एखाद्या कोरोनाबाधित लोकांना काहीतरी फुकट देण्याचं जाहीर करताना हे तसुभर देखील विचार करत नाहीत. कारण फुकट वाटप केलं म्हणून त्याची संपूर्ण जिल्हाभर जाहिरात करता येते. कोरोनाच्या महामारीत यांनी इतकी मदत केली यात यांनी कोणता मोठा तीर मारला नेमकं हेच  कळतं नाही. ज्या सामान्य माणसाच्या दारात दर 5 वर्षांनी मतांची भीक मागताना माणुसकी खातर, आपला हक्काचं माणूस म्हणून ज्यांनी निस्वार्थपणे मतांची भीक नेत्यांच्या झोळीत टाकली त्याचं निस्वार्थी माणसांना त्यांच्या अशा अडचणी वेळी मदत केली तर यात बिघडलं कोठ? निवडणुकी वेळी दिलेल्या आश्वासन यांना कधीचं पाळता आली नाही. पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार, या साऱ्या गोष्टी फक्त दिवा स्वप्नच राहील आहे. ज्यांना शिक्षणाचा गंध देखील नाही अशा नेत्यांना देखील लोकांनी प्रेमाखातर मोठं केलं, पण त्या सामान्य माणसांना खुर्ची सम्राटांची नेहमी पाठच दाखवली आहे. गावातील कोरोना संदर्भात प्रशासना, आरोग्य विभागाने घेतलेल्या एखाद्या निर्णयात हस्तक्षेप करताना यांना कोणता मोठेपणा वाटतो हे या घडीला कळलंच नाही,  सामान्य नागरिकांच्या आरोग्यापेक्षा यांना आपल्या गटाचा मोठेपणा मोठा वाटतो. सामान्याच्या आरोग्याची प्रतारणा झाली तरी चालेल पण आपल्या गटाचा वरचष्मा राहिला पाहिजे यातच या पुढाऱ्यांना धन्यता वाटते. यातून साध्य इतकंच झालं ही सुखानं नांदणाऱ्या गावातली प्रत्येकाच्या मनात आपला नेता मोठा दुसऱ्यांचा लहान या विषान शिरकाव केला, आपला नेता किती कर्तृत्ववान,दानशूर हे सांगण्यात चढाओढ सुरू झाली आणि गेली 5 महिने ज्या हातांना काम मिळालं नाही त्या हातांना गटातटातची ऊणीदुणी काढण्याचं फुकटच काम मिळालं. आपल्या बापानं आपल्यासाठी केलेल्या कष्टापेक्षा नेत्यानं स्वार्थापोटी केलेल्या कामाचं कौतूक वाटायला सुरुवात झालीय. काम नसलेल्या हातांना आपल्या रोजगारापेक्षा सोशल मीडियावर नेत्यांची फुकटची व्हाव्हाव्हा करण्यात मोठेपणा वाटायला सुरुवात झालीय. यातून नेत्यांच्या अंगावर मूठभर मास चढत आहे, पण त्यांच्या घरच्या माणसांच्या काळजात ठोका सुचताना त्यांच्या नजरेत येत नाही. नेत्यांची राजकीय पोळी भाजून घेण्याच्या धंदा सुरू झालाय हे कळत असून देखील स्वतःच्या भाकरीची चिंता मात्र आता खेडयातील युवकांना अजिबात जाणवत नाही. खेडयात कोरोना जरी आला असला तरी, राजकीय पुढाऱ्यांच्या स्वार्थाच्या कोरोनाने भयानक रुद्रावतार धारण केला आहे. कोरोनावर औषध येईल पण या राजकीय कोरोनावर औषध येणं फार कठीण आहे. कोरोनाने ग्रामीण भागातील राजकारणाचा बाजच बदलला आहे. सामान्यांच्या गरजेपेक्षा गटाचा राजकारण इथे श्रेष्ठ मानलं जात आहे. 
   
     ग्रामीण भागातील अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या राजकारणी लोकांनी आता निव्वळ राजकारण न करता वस्तुस्थिती म्हणुन बघणं गरजेचे आहे. विकासाची परिभाषा काय आहे, आपल्या सामान्य नागरिकांच्या आपल्याकडून अपेक्षा काय आहेत हे खरोखर समजून घेणं गरजेचं आहे. 21 व्या शतकात प्रगतीच्या वेगवान गाडीत बसलेल्या तज्ज्ञांकडून कोरोनावर लस निश्चित येईल, सरकार प्रत्येकापर्यत ती लस पोहच देखील करेल. कोरोना आज ना उद्या नक्की जाईल पण राजकीय मंडळींनी दुभंगलेली मन मात्र कधीच एकत्र येणार नाहीत. सामान्य माणसाच्या भावनांशी खेळून ज्याची जाहिरात केली ती जाहिरात इथल्या तमाम सृजन नागरिकांनी मनात कोरून ठेवली आहे. येणाऱ्या काळात हीच जाहिरात त्यांच्या राजकीय अस्तित्वातचा डोलारा ढासळण्यांसाठी उपयोगी ठरणार आहे. म्हणून माणुसकी या एकाच नात्याने पुढाऱ्यांच्यातील दातृत्व बाहेर यायला हवं. एखाद्या सामान्य कार्यकर्ता स्वतः मदत करत असेल,कोरोनाच्या महामारीत स्वतःच योगदान देत असेल तर त्याचं कौतुक करण्याचं औदार्य पुढाऱ्यांच्यात निर्माण व्ह्यायला हवं. जाहिरातीच्या पलीकडे जावून सामान्य माणसांशी जोडले जाण्याची सुबुद्धी नेत्यांना आता तरी सुचायला हवी. याउलट आता प्रत्येकवेळी गावातील एखादा मुद्दा जर नेत्यांच्या सोयी नुसार बदलणार असेल, तर भोळ्या माणसांनी आता शहाण होणं गरजेचं आहे. चांगल्या कार्याचं कौतुक करता आलं पाहिजे. राजकीय फायदासाठी, गटातटासाठी केलेलं कार्य हे कार्य नसून निव्वळ स्वार्थ आहे हे आता सामन्यांनी ओळखणं गरजेचं आहे. नेत्यांनी केलेल्या मदतीपेक्षा आपल्या जिवलगांनी केलेली मदत ही खरी मदत असते, त्यांनी दिलेला आधार हा अंतकरणातुन दिलेला आधार असतो हे जेव्हा आपण ओळखू तेव्हाच तर गावातील माणुसकीचा झरा सदैव पाझरत राहणार आहे.आणि गुण्यागोविंदान नांदणारी आपली गावं अजून समृद्ध होणार आहेत. 

(टीप: लेखातील सर्व मते वैयक्तिक आहेत)

Post a Comment

1 Comments