करमाळा :
सीना कोळगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांना बुडीत झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानभरपाईसाठी रु. ९,७१,९५,००० (नऊ कोटी एक्याहत्तर लक्ष पंच्याण्णव हजार) रुपयांचा वाढीव मोबदला मंजूर करण्यात आला आहे. ही माहिती मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ पाटील यांनी पत्रकारांना देताना सांगितली.
सीना कोळगाव धरण प्रकल्पासाठी मौजे निमगाव (ह) येथील शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित करण्यात आली होती. यासाठी त्यांना दिली जाणारी नुकसानभरपाईची रक्कम अत्यंत तुटपुंजी आहे, असे मानून धरणग्रस्त शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिनियम, १८९४ च्या कलम २८(अ) अंतर्गत वकील सूर्यकांत सरडे यांच्या मार्फत वाढीव मोबदल्यासाठी दावे दाखल केले होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड यांनी हे दावे मंजूर केल्यानंतर ही रक्कम मंजूर झाली आहे. प्रकल्प विभाग, परांडा येथील कार्यकारी अभियंत्यांना हा निधी उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल आणि शिवसेना नेते दिग्विजय बागल यांचे मोलाचे सहकार लाभल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. त्यांनी हा निधी तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली.
शेवटी, श्री. नीळ पाटील यांनी मंत्री जयकुमार गोरे, रश्मी बागल, दिग्विजय बागल आणि वकील सूर्यकांत सरडे यांचे मनःपूर्वक आभार मानले.
0 Comments