माढा -करमाळ्यात आमदार शिंदे बंधू बॅकफूटवर ; संजयमामाचा खरंच मतदारांनी मामा केला


सोलापूर |

 माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पराभवानंतर आमदार बबनराव शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे यांना चांगलाच दणका बसला आहे. माढा आणि करमाळा तालुक्यातून एक लाखाचे मताधिक्य देण्याची भाषा करणाऱ्या आमदार संजय शिंदे यांना मतदारांनी मामा बनवल्याची मजेदार चर्चा होऊ लागली आहे.

समविचारी आघाडीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीची मूळ सोलापूर जिल्ह्यात खोलवर रुजवण्यात आमदार संजय शिंदे यांचा मोठा वाटा आहे भारतीय जनता पार्टीच्या पाठिंबावरच ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे संजय शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून माढा लोकसभेचे उमेदवारी घेतली परंतु माळशिरस तालुक्याने तब्बल एक लाखाहून अधिक मताधिक्य भाजपचे उमेदवारांचे निंबाळकर यांना दिल्याने संजय शिंदे यांचा पराभव झाला त्यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाने संजय शिंदे यांच्या पाठीशी राहून मोठे मताधिक्य द्यायला अपेक्षित होते मात्र फक्त तीस हजाराचे मताधिक्य माढ्यातून मिळाले.

यावेळी मोहिते पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी मागितली परंतु रणजीतसिंह निंबाळकर यांच्या पाठीशी पाच आमदार उभे राहिल्याने त्यांच्याच जोरावर भाजपने पुन्हा निंबाळकर यांना माढयाच्या मैदानात उतरवले. शिंदे बंधूच्या जोरावर भाजपने ही उमेदवारी दिली.

माळशिरसने जरी मोठे मताधिक्य दिले तरी तो लीड तोडण्यासाठी माढा आणि करमाळा तालुक्यातून भाजपला तब्बल एक लाखाचे मताधिक्य देण्याची भाषा केली गेली. पण निवडणुकीत झाले उलटेच. माढा आणि करमाळ्याने निंबाळकर ऐवजी धैर्यशील मोहिते पाटील यांना तब्बल एक लाखापर्यंतचे मताधिक्य या दोन्ही तालुक्यांनी दिले.

 संजय शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असताना ही ते मोहिते पाटील विरोधात राहिले आहेत. त्यांनी 2014 साली भाजप महायुती मधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष जिल्हा परिषद लढवताना भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवर अध्यक्ष पद मिळवले. प्रशांत परिचारकांना भारतीय जनता पार्टी कडून आमदार बनवले. 2019 मध्ये मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेल्याने पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. माढा लढवली त्यात पराभूत झाले, परत करमाळा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंबावर आमदार झाले.

आमदार झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सपोर्ट केले पण राज्यात समीकरणे बदलली. महाविकास आघाडी स्थापन झाली. तेव्हा मात्र संजय शिंदे हे अजित पवार यांच्या सोबत महाविकास आघाडीत आले. अडीच वर्षानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले. संजय शिंदे अजित पवार यांच्यासोबत महायुती मध्ये गेले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून उमेदवार असल्याने 2019 च्या निवडणुकीत ज्यांनी त्यांचा पराभव केला त्या खासदार निंबाळकर यांचा सोबत राहून त्यांचा प्रचार केला. या निवडणुकीत मामांचा पचका झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे संजय शिंदे यांनी कुठेतरी स्थिर राहावे अशी चर्चा आता राजकिय वर्तुळात होऊ लागली आहे.

Post a Comment

0 Comments