महायुतीसाठी चिंताजनक बातमी; भाजपला पहिला धक्का महाराष्ट्र देणार?


लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजेच 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागणार आहे. भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 400 पारचा नारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे इंडिया आघाडीने देखील निकालाबाबत मोठं भाकीत केलं आहे. अशात राज्यातील निकालाबाबत मोठी भविष्यवाणी समोर आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी मोठा दावा केला आहे.

नेमकं काय म्हणाले विजय चोरमारे?
लोकसभा निवडणुकीसाठी जी प्रक्रिया झाली, प्रचार करण्यात आला आणि एकूण मतदान पाहिलं तर, 4 जून रोजी दिल्लीत जे राजकारण होणार आहे, त्यात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे. कारण, उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. गेल्यावेळी महायुतीला 42 जागा मिळाल्या होत्या. त्यात 1 जागा ही नवनीत राणा यांची होती. असं विजय चोरमारे यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, “महाविकास आघाडीमुळे नवनीत राणा निवडून आल्या. पण, नंतर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्या 42 जागा होत्या. म्हणजेच 48 जागांपैकी पाच जागा महाविकास आघाडीला होत्या आणि एक जागा एमआयएमची होती. म्हणजेच इतक्या मोठ्या प्रमाणात तेव्हा महायुतीला यश मिळालं. तिथे एनडीएला फार मोठा फटका बसणार आहे. इथे महाविकास आघाडीला अधिक चांगल्या जागा मिळणार आहे.”, असा दावा यावेळी विजय चोरमारे यांनी केला.

“नागरिक आणि शेतकऱ्यांच्या मनात संताप”
“शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेली फूट हा मुद्दा मोदी-शाहांपासून फडणवीसांपर्यंत या सर्वांनी चर्चेत ठेवला. म्हणजे जो मुद्दा प्रभाव पाडू शकतो, तो दुर्लक्षित करायला हवा होता. पण त्यांनी तसं केलं नाही. आपण जर राज्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर या फुटीवर त्यांच्या मनात संताप होता.”, असंही यावेळी विजय चोरमारे म्हणाले.

“महाविकास आघाडीला 30 जागा मिळतील. म्हणजेच भाजपला 25 जागांचा फटका बसेल. राज्यात 25 जागा म्हणजे देशभरात एनडीए 300 वरून 275 वर येते. त्यामुळे 300 च्या खाली येण्याचा पहिला धक्का महाराष्ट्र देणार आहे.”, असा दावाच यावेळी विजय चोरमारे यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतही मोठं भाष्य केलं. “केंद्रात 10 वर्षापासून मोदींच्या नेतृत्वात सत्ता आहे. या सरकारने अनेक अश्वासने दिली. एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. फक्त दहा वर्ष गप्पा मारल्या. महागाई कमी झाली नाही. गॅस सिलिंडरचा दर कुठे गेला हे लोकांसमोर आहे. यांच्याकडून काही घडलं नाही हे लोकांनी पाहिलं आहे. राम मंदिर झालं याबाबत दुमत नाही. कायदेशीर मार्गाने झालं ते चांगलं केलं. पण हे सांगतात आम्ही आश्वासन पूर्ण केलं. पण या आश्वासनाचा सामान्य माणसांचा संबंध नाही.”, असं असं विजय चोरमारे म्हणाले.

Post a Comment

0 Comments