अब्दुल सत्तार आणि दानवेला लोकसभा निवडणुकीत चकवा दिल्याची चर्चा


जालना |

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या लोकसभेच्या जालना मतदारसंघातील सलग पाच विजयात सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा मंत्री अब्दुल सत्तार यांची साथ मोलाची ठरली होती.

लोकसभेच्या बदल्यात विधानसभेला मदत हे गणित गेल्या वीस वर्षापासून दानवे-सत्तार यांच्यात ठरलेले होते. सत्ताराची सासुरवाडी दानवेंच्या भोकरदन, तर दानवेंची सासुरवाडी सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात. यामुळे या दोघांची गट्टी चांगली जमली होती. दोघांचेही राजकारण गुण्यागोविंदाने सुरू असतांना या लोकसभा निवडणुकीत मात्र त्याला कोणाची तरी नजर लागल्याची चर्चा आहे. राजकारणात विरोधकांना चकवा देण्यात माहिर असलेल्या रावसाहेब दानवे यांना यावेळी मात्र सत्तारांकडूनच चकवा मिळाल्याची जोरदार चर्चा आहे.

रावसाहेब दानवे यांच्या विजयात आणि मताधिक्यात सत्तारांच्या सिल्लोड सोयगावचा मोठा वाटा राहिला आहे. यावेळी मात्र नाराज सत्तारांनी मैत्री धर्म न निभावता वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा आहे. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील मुस्लिम वोट बॅंक सत्तारांच्या शब्दा बाहेर नाही हे वगळे सांगायला नको.

यावेळी मात्र सत्तार यांनी कुठलाच पर्याय शिल्लक न ठेवता काँग्रेसमधील त्यांचे जुने मित्र कल्याण काळे यांना मदतीचा हात दिल्याचे समजते. त्यामुळे जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडून येत विजयाचा षटकार ठोकू पाहणाऱ्या रावसाहेब दानवे यांचा झेल सीमारेषेतच टिपला जाऊ शकतो, अशी चर्चा मतदारसंघात उघडपणे सुरू आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून समाजामध्ये असलेला रोष अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांना मोठ्या प्रमाणात मतदान होऊ व्यक्त होईल, असा अंदाज होता. पण तोही फोल ठरल्याची चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments