✒️ प्रा.डॉ.प्रभाकर तानाजी माने
प्रमुख, अर्थशास्त्र विभाग
जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर
-------------------------------------------------------
१ ऑगस्ट, 2020 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात किंबहुना भारतात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृति शताब्दी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.यासाठी शासकीय पातळीवर,सामाजिक संस्था,सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, राजकीय संघटना व समाजाकडून हा कार्यक्रमरुपी राष्ट्रीय उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला व साजरा होणे गरजेचे आहे. या शताब्दीच्या निमित्ताने सर्व पातळीवर या महामानवांना अभिवादन करून त्यांच्या आचार विचाराची चर्चा मोठ्या दिमाखात पार पडली मग पुढे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमकं समाजाला काय उपयोगिता प्राप्त झाली तसेच समाजात नेमका कोणत्या पद्धतीचा प्रेरणा निर्माण झाली की नाही याची चर्चा होणे गरजेचे आहे.
मित्रांनो लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांचा जीवनपट म्हणजे या देशातील प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टीने आशास्थान व प्रेरणास्त्रोत आहे.या दोहोंच्या कार्याची महती व लोकमान्य टिळकांचा एक सामान्य कार्यकर्ता पासून ते राष्ट्रीय नेता पर्यंतचा प्रवास सर्वांना माहीत असणे महत्त्वाचे आहे.सुरुवातीच्या काळात लोकमान्य टिळक एक साधा कार्यकर्ता म्हणून कार्य करीत होते.परंतु आद्य क्रांतिकारक वासुदेव फडके यांना गुरु मानत असल्यामुळे त्यांच्या मृत्यू नंतर मात्र लोकमान्यांना लक्षात आले की एकटा व्यक्ती या इंग्रजी साम्राज्य उलटवून शकत नाही.याकरिता आपल्या पाठीशी प्रचंड प्रमाणात समर्थकांची म्हणजे जनतेच्या पाठबळाची गरज असते.त्यानंतर मात्र टिळकांनी स्वतःच्या हिमतीवर, स्वकर्तृत्वावर स्वातंत्र्याची चळवळ उभी करून देशासाठी बलिदान देणाऱ्या हजारो स्वातंत्र्यसैनिक फौज निर्माण केली.अर्थात इंग्रजी सत्तेला हादरवून टाकण्याचे काम त्यांनी केले.एक मराठी माणुस धैर्य, चिकाटी,वैचारिक प्रगल्भता, बुद्धिचातुर्य,संघटनात्मक कार्याच्या व लेखणीच्या जोरावर राष्ट्रीय चळवळीचा प्रमुख राष्ट्रीय नेता बनून त्यांनी चळवळीची नेमकी दिशा काय असली पाहिजे व इंग्रजी साम्राज्याला कशी टक्कर दिली पाहिजे याचा निर्णय घेणारा नेत्यापर्यंत मजल मारली. याचा अर्थ ते हिंदुस्थानच्या राष्ट्रीय धोरणाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी होणारा एक सक्षम नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली.
स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे.या प्रेरणादायी पूर्ण वाक्यांच्या माध्यमातून त्यांनी तरुणांच्या मनात देश प्रेमाचे जाज्वल्य,स्वराज्य विषयी आस्था व गुलामगिरीच्या बेड्या तोडण्यासाठी त्यांनी अखंडपणे केलेले कार्य आपणा सर्वांसाठी आज ही महत्त्वाचा आहे. " सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय " या अग्रलेखाच्या माध्यमातून सरकारला त्याच्या कार्यपद्धतीविषयी निर्भीडपणे व परखडपणे आपलं मत व्यक्त करणारे हे व्यक्तिमत्व आदर्शवादी आहे.मंडालेच्या कारागृहात बंदिवासात असताना त्याने 'गीता सार' हा ग्रंथ लिहून आपण आपलं लेखन कार्य कोणत्या बिकट परिस्थितीत होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. या ग्रंथाच्या द्वारे त्यांनी जीवन विषयक दृष्टिकोनाची मांडणी करून प्रत्यक्ष कृतीशील कार्य पूर्ण केले. याचा अर्थ उक्तीला कृतीची जोड देणारा हा महान व्यक्ती आपल्याला विविध मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतो. त्यांचे संपूर्ण जीवन कार्य हे आपणा सर्वांना सकारात्मक उर्जे बरोबर कृती करण्यास भाग पाडायला लावणारा आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म दलित समाजात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाला आहे.ज्यांचे बालपण पोटासाठी तमाशा व नाटक यामधील हलकीशी कामे करण्यासाठी गेली.तसेच त्या दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील म्हणजे प्रतिसरकार यांच्या विचाराने प्रेरित होऊन व नंतरच्या काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली.त्याचवेळी साठे कुटुंबातील अठराविश्व दारिद्र्य न संपणारे आहे. हे त्यांच्या वडिलांच्या लक्षात येताच पोटासाठी म्हणून सर्व कुटुंबाबरोबरच त्यांनी पायीप्रवासातून मुंबई गाठली. वडीलांना हातभार लावण्यासाठी वृत्तपत्र वाटप,कपड्याना इस्त्री करणे,भिंतीवर जाहिराती लावणे, बागकाम काम करणे अशा प्रकारचे पडेल ते काम त्यांनी पूर्ण केले. अशावेळी थोर स्वातंत्र्यसेनानी, महान व्यक्ती यांची व्याख्याने ऐकण्यास मिळाली. त्यावेळेस मोर्चा,रॅली व आंदोलनाच्या माध्यमातून त्यांची जवळीकता या महान लोकांशी आली.समाजातील शोषित,वंचित, उपेक्षित,कष्टकरी व कामगारांचा आवाज आपल्या साहित्य व शायरी मधून बुलंद करण्याचा प्रयत्न केला.
अण्णा भाऊंनी आपल्या लेखणीच्या साह्याने "घालून गेले घाव सांगून गेले भीमराव" यामधून डॉ.आंबेडकर यांच्या कर्तृत्व मान्य करून आपल्या दलीत व बहुजन समाजासाठी मोठेपणा दाखवून दिला.भारतात व महाराष्ट्रात ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्यामधील गोवा मुक्तिसंग्राम,संयुक्त महाराष्ट्राची चळवळ व दलित चळवळी यासाठी अण्णानी आपल्या शाहिराच्या माध्यमातून कार्यकर्ते व लोकांच्या मनात स्फूर्ती निर्माण केली.
अण्णांनी कधीही शाळेची पायरी न चढली.परंतु आपल्या सांगोपांग व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून व तळपत्या लेखणीतून शेकडो कथा,कादंबरी, प्रवासवर्णन, नाटक, तमाशा, कविता व शाहिरी लिहिण्याचे कार्य पूर्ण केले व कालांतराने त्याचे या साहित्यांचे विविध भाषेत भाषांतरित झाली. त्यांचे स्वतःचे जीवन हे लोक विद्यापीठ असून त्यांच्या साहित्यावर एम.फिल व पीएच. डी.संशोधनाचे कार्य सुरू आहे. अनेक शिक्षणतज्ञ व सरकारला त्यांच्या साहित्याची दखल घ्यावी लागते. आज अनेक चळवळीचे प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.आजच्या युवकाला त्यांचं जीवनपट हा दीपस्तंभा प्रमाणे मार्गदर्शक ठरतो.
आजच्या परिस्थितीत सध्याच्या राज्यकर्त्यांना या दोन महा पुरुषा च्या कार्याची दखल घ्यावी लागते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे काल १ऑगस्ट ,2020 रोजी उच्च व तंत ्रशिक्षणमंत्री मा.उदय सामंत यांनी या दोन महान व्यक्तींच्या नावे मुंबई विद्यापीठात स्वतंत्रपणे अध्यासन केंद्राच्या निर्मितीची घोषणा करावी लागते.या महापुरुषांच्या अध्यासन केंद्राच्या माध्यमातून भावी पिढीला प्रेरणादायी आचार-विचार, कृतिशील व आदर्शवादी भारतीय नागरिक निर्माण व्हावेत ही त्यामधील भूमिका व उद्देश अपेक्षित असावा. तत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रकारचे टीव्ही मोबाईल दळणवळण व्यवस्था व अन्य सोशल मीडिया नसतानाही संपूर्ण हिंदुस्थानातील लोकांना एकत्रित करून लोक चळवळ उभी करणे अत्यंत अवघड काम होते.आजच्या घडीला आपल्यासमोर अनुकूल परिस्थिती असताना ही अशा प्रकारचे समाजपयोगी कार्य होणे अपेक्षित आहे. सरतेशेवटी या महामानवांचे कार्य हे बुद्धीला सत्याकडे,भावनेला माणुसकीकडे आणि कर्तृत्वाने वैचारिक गुलामगिरीचा अंत करणारे व सद्यपरिस्थितीत आपल्यासारख्या सामान्य व्यक्तींच्या आशा व प्रकाशरुपी ज्योत पल्लवित करणारी आहे.अशा या राष्ट्रीय नेत्यांच्या कर्तुत्वाला कोटी कोटी प्रणाम करतो.
0 Comments