खेकड्या’ने अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केलीय; पुण्यातील घटनेवरून रोहित पवारांची टीका


मुंबई |

 पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दावा केला आहे की, मी नियमबाह्य काम करत नाही म्हणून माझं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल होत असून याप्रकरणी आता राष्ट्रावीद काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. 

रोहित पवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने (तानाजी सावंत) आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरुवात केली आहे. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर आपल्या संपूर्ण आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? असा प्रश्नांचा भडीमार रोहित पवार यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. भगवान पवार यांनी तानाजी सावंत यांच्यावर आरोप करताना म्हटले की, मी सार्वजनिक आरोग्य विभागातील ज्येष्ठतम अधिकारी असून माझी एकूण 30 वर्षांची सेवा झालेली आहे. मागच्या पाच वर्षात माझी कामगिरी अत्यंत चांगली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची माझ्या कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. करोना काळात मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई, विभागायी आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडून माझा वेळोवेळी सत्कार झाला आहे. माझे कामकाज आणि सेवेची नोंद उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून मला त्रास देण्याच्या हेतूने माझे निलंबन करण्यात आले आहे. मंत्र्यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे आणि इतर कामामध्ये मदत करण्यास दबाव आणला होता. परंतु मी नियमबाह्य कामात मदत केली नाही, हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक केली आणि माझे निलंबन केले, असा आरोप डॉ. भगवान पवार यांनी केला आहे

Post a Comment

0 Comments