रोहित शर्मा साठी पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटाने लावली फिल्डिंग


मुंबई |

आयपीएल 2024 स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघांची धडपड सुरु झाली आहे. प्रत्येक सामन्याच्या निकालानंतर गुणतालिकेवर परिणाम होताना दिसत आहे. पाच वेळा जेतेपदावर नाव कोरलेल्या मुंबई इंडियन्सची स्थिती नाजूक आहे.

आतापर्यंत सहा सामन्यातील चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर पंजाब किंग्सची स्थितीही तशी आहे. पण मुंबई इंडियन्सपेक्षा रनरेट चांगला असल्याने सातव्या स्थानावर आहे. तर मुंबईचा संघ आठव्या स्थानावर आहे. आता हे दोन्ही संघ 18 एप्रिलला आमनेसामने येणार आहेत. तत्पूर्वी पंजाब किंग्सची सह मालकीन प्रीति झिंटा हीने रोहित शर्मासाठी फासे टाकले आहेत. तिच्या डोक्यात आयपीएल 2025 स्पर्धा आतापासून फिरत आहे. यासाठी तिनेही काहीही करण्याची तयारी ठेवली आहे. आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव होणार आहे. यात काही खेळाडूंना रिलीज केलं जाणार आहे. मुंबई इंडियन्सने कर्णधारपदाची माळ हार्दिकच्या गळ्यात घातल्याने रोहित शर्माला रिलीज करेल अशी चर्चा रंगली आहे. त्यामुळे रोहित शर्मावर बरेच जण नजर ठेवून आहेत.

पंजाब किंग्सने आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. त्यामुळे फ्रेंचायसीचं गेल्या काही वर्षांपासूनचं स्वप्न अधुरं आहे. यंदाही पंजाबच्या संघात काही खास दिसत नाही. प्रीति झिंटाने सांगितलं की, “जर रोहित शर्मा लिलाव आला तर त्याला घेण्यासाठी मी माझं जीवही डावावर लावीन. आम्हाला आमच्या संघासाठी अशा कर्णधाराची गरज आहे. जो संघात स्थिरता आणि जेतेपदाची मानसिकता घेऊन येईल.” रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 साली जेतेपद मिळवलं होतं.

पंजाब किंग्सने आयपीएल 2014 मध्ये अंतिम फेरी गाठली आहे. मात्र कोलकाता नाईट रायडर्सने जेतेपदाचं स्वप्न भंग केलं होतं. 3 विकेट्स राखून अंतिम फेरीत पंजाबचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं. त्यानंतर पंजाब किंग्सने अंतिम फेरी कधीच गाठली नाही. आताही पंजाब किंग्स संघाचा फॉर्म पाहता तिथपर्यंत पोहोचणं कठीण दिसत आहे. मात्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होईल सांगता येत नाही.

आयपीएल 2024 स्पर्धेत पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स सातव्या आणि आठव्या स्थानावर आहे. मात्र असं असलं तरी प्लेऑफचा मार्गही बंद झालेला नाही. उर्वरित आठ सामन्यापैकी 6 सामने जिंकले तरी प्लेऑफचं गणित सुटू शकतं. जर तरच्या आधारावर नेट रनरेट चांगला असला तर नक्कीच दोन्ही संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवू शकतात. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात प्लेऑफची शर्यत आणखी चुरशीची होणार यात शंका नाही.

Post a Comment

0 Comments