साहेब, पाकिट मिळालंय, तुमचा वाटा कुठे पाठवू? एक कोटीची लाच घेताना एमआयडीसीचा अधिकारी अटकेतअहमदनगर |

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या पथकाने शुक्रवारी रात्री नगरमध्ये मोठे कारवाई केली आहे. एका कंत्राटदाराकडून आपल्यासाठी आणि बदलून गेलेल्या वरिष्ठांसाठी एक कोटी रुपयांची लाच घेताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबणारे नसून यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.

सहायक अभियंता वर्ग २ अमित किशोर गायकवाड (वय ३२ रा. नागापूर, नगर, मूळ रा. चिंचोली, ता. राहुरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो नगर एमआयडीसीमध्ये नियुक्तीला आहे. तेथेच पूर्वी नियुक्तीला असलेले तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ (रा. नगर) यांच्याविरूद्धही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वाल्हवरकर यांच्या पथकाने ही कारवाई करत लाचखोर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या. या संदर्भात रात्री उशिरा अहमदनगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. त्याने तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता अमित गायकवाड या इसमाला औरंगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास जवळ रात्री उशिरा लाच घेताना अटक करण्यात आली. एमआयडीसी अंतर्गत ठेकेदाराने 100 mm व्यासाचे पाईप टाकण्याचे काम केले होते. या कामाचे तब्बल 2 कोटी रुपयांचे बिल झाले होते. दरम्यान या बिलाची मागणी ठेकेदाराने केल्यानंतर मागचे बिल आउटवर्ड वर घेऊन तत्कालीन अभियंताची सही घेण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित गायकवाड याने फिर्यादी ठेकेदार याच्याकडे एक कोटी रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर त्या अधिकाऱ्याविरोधात नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

Post a Comment

0 Comments