बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, डॉक्टरचे कोणतीही पदवी नसताना चालवत होता दवाखाना


मुंबई |

मुंबईतील गोवंडी परिसरात एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी नसतानाही दवाखाना चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बोगस डॉक्टरच्या मुसक्या आवळल्या आहेत. अल्ताफ हुसैन (वय ५०) असं आरोपीचे नाव आहे. त्याने जवळपास ५ वर्षे दवाखाना थाटला होता. त्यासाठी लागणारी कोणतीही पदवी अथवा शिक्षण त्याने घेतले नव्हते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. यासंबंधीचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्रानं प्रसिद्ध केलं आहे. हुसैन हा अवैधरित्या दवाखाना चालवत असल्याची माहिती मुंबई क्राइम ब्रँचच्या युनिट ६ ला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. छापा मारण्यापूर्वी मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी एका पोलीस हवालदाराला रुग्ण म्हणून क्लिनिकमध्ये पाठवले होते. त्याच्यासोबत एक व्यक्तीही पाठवली होती. तेव्हा आरोपीने त्यांना औषध लिहून दिले, असे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी सांगितले.

या प्रकाराची संपूर्ण माहिती एम (पूर्व) वॉर्डच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली. त्यांच्या मदतीने छापेमारी करण्यात आली. आरोपीकडे एमबीबीएस, बीएएमएस किंवा बीएचएमएस अशी कोणतीही पदवी नव्हती. त्याची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल बोर्डाकडे नोंदणीही नव्हती. “आम्ही त्याच्या क्लिनिकमधील सर्व औषधे आणि इतर उपकरणे जप्त केली,” असे रोशन यांनी सांगितले. हुसैनला विभागीय कार्यालयात आणण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान तो उत्तर प्रदेशचा रहिवासी आणि फक्त १२ वी पर्यंत शिक्षण झाल्याची कबुली त्याने दिली. त्याने यापूर्वी मुंबईत एका डॉक्टरकडे कंपाउंडर म्हणून काम केले होते. त्याला औषधांबद्दल थोडीफार माहिती होती. त्यानंतर त्याने गोवंडीच्या झोपडपट्टी परिसरात स्वतःचं क्लिनिक सुरू केलं होतं. पुढील कारवाईसाठी हुसैनला शिवाजी नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

Post a Comment

0 Comments