करमाळा | माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो म्हणत ; गौंडरे फाटा येथे एकावर चाकू हल्ला
करमाळा |

'तू माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो, तिच्यावर तू अत्याचार केला आहे, आता तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून धारदार चाकूने पोटात वार करत एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार गौंडरे फाट्यावर घडला आहे. याबाबत एका विरुद्ध कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये समाधान रोहिदास नीळ (वय २७) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी नीळ याच्याकडे एक ट्रॅक्टर आहे. आवटी येथे तो शेतात लेवलचे काम करत आहे. त्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर काम करतो. फिर्यादी नीळ याच्याविरुद्ध दोन वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. बुधवारी (ता. ३) ८ वाजता तो निमगाव येथून ट्रॅक्टरला डिझेल देण्यासाठी आवटी येथे गेला. तेथे डिझेल देऊन एका अनोळखी व्यक्तीच्या मोटरसायकलवरून तो गौंडरे फाटा येथे आला.

तेथून चालत जात असताना संशयित आरोपीने त्याच्या मोटरसायकलवरून येऊन त्याच्या पोटावर चाकूने वार केले. तो फिर्यादीला म्हणाला, 'तू माझ्या बायकोकडे वाईट नजरेने बघतो. तिच्यावर अत्याचार केला आहे. आता तुला जिवंत सोडणार नाही' असे म्हणून त्याने धारदार चाकूने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने डाव्या बाजूच्या पोटावर मारून गंभीर जखमी करून शिवीगाळ व दमदाटी केली आहे. त्यानंतर तो मोटरसायकलवर पळून गेला.

Post a Comment

0 Comments