राजा माने यांना "न्यूज मेकर्स अचिव्हर्स "राष्ट्रीय पुरस्कार जाहीर ; १ हे रोजी मुंबईत पुरस्कार वितरण



मुंबई |

"अफ्टरनून व्हॉइस"या माध्यम समुहाच्यावतीने दिला जाणारा या वर्षीचा "न्यूज मेकर्स अचिव्हर्स " राष्ट्रीय पुरस्कार ज्येष्ठ संपादक,लेखक ,माध्यम तज्ज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना जाहीर झाला आहे.हा पुरस्कार महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात होणाऱ्या विशेष सोहळ्यात प्रदान केला जाणार आहे. समुहाच्या प्रमुख डॉ.वैदीही मातान यांनी ही घोषणा केली. 

गेल्या पंधरा वर्षांपासून "आफ्टरनून व्हॉइस" हा समूह देशातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करुन त्यांच्या कार्याचा गौरव करतो.गेल्या ३८ वर्षात मराठी पत्रकारितेत दिलेल्या योगदानाबद्दल तसेच डिजिटल मिडिया क्षेत्रातील संघटनात्मक बांधणी कार्याबद्दल हा राजा माने यांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.माने यांनी आपल्या कारकीर्दीची लोकमत वृत्तपत्र समुहात औरंगाबाद येथून प्रशिक्षणार्थीं उपसंपादक म्हणून सुरुवात केली.

लोकमतमध्ये त्यांनी निवासी संपादक, संपादक,राज्याचे राजकीय संपादक म्हणून राज्यात अनेक आवृत्त्यांना काम केले.एकमत, पुढारी, पुण्यनगरी, सुराज्य या दैनिकांमध्ये कार्यकारी संपादक म्हणून तर सोलापूर तरुण भारतामध्ये समूह संपादक म्हणून काम केले आहे.राज्यातील पत्रकरितेतील पन्नासहून अधिक मानाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.त्यांची सहा पुस्तके असून महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील,लेक माझी लाडकी व ज्यांनी आभाळ कवेत घेतलं या पुस्तकांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार,कवी रा.ना.पवार असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील २८ तलावातील गाळ काढण्याचे चळवळीचे नेतृत्व करुन त्यांनी जलयुक्त शिवार मोहिमेत मोलाचे योगदान दिले आहे.बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठान व भाग्यकांता या समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक कार्यात सक्रीय आहेत."आफ्टरनून व्हॉइस"समुहाने आजवर पुरस्कार देवून गौरविलेल्या मान्यवरांच्या नामावलीत स्व.लता मंगेशकर,स्व.बाबासाहेब पुरंदरे,स्व.बाबा आमटें सारख्या विभुतींबरोबरच कपिल शर्मा, राजदीप सरदेसाई,साहिल जोशीं सारख्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments