करमाळ्यात भाऊभावाच्या मोटारसायकलला जोराची धडक; चिमुकल्याचा मृत्यू, गाडीने घेतला जागेवर पेट


करमाळा |

तालुक्यातील रावगाव ते डुकरेवाडी रस्त्यावरून कृषीपंप सुरु करण्यासाठी जात आसलेल्या भाऊ-भाऊच्या मोटारसायकलला समोरून आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन एका अल्पवयीन भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. साईराज ज्ञानेश्वर डुकरे (वय १५, रा. डुकरेवाडी, ता. करमाळा) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. यामध्ये आप्पा साळवे (वय ५०, रा. डुकरेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, धडकेनंतर मोटारसायकलने जागेवर पेट घेतला.

करमाळा तालुक्यातील डुकरेवाडी येथे डुकरेवाडी ते रावगाव रस्त्यावर १२ तारखेला रात्री १० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. याप्रकरणात तुषार अंकुश डुकरे (वय २४, रा. डुकरेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. तुषार व साईराज हे दोघे चुलत भाऊ आहेत. ते मोटारसायकलवर कृषीपंप सुरु करण्यासाठी शेतात जात होते. तुषार हा मोटारसायकल चालवत होता तर साईराज मागे बसला होता.

विष्णू डुकरे यांच्या शेताजवळ त्यांची गाडी आली तेव्हा समोरून भरधाव वेगाने आलेल्या मोटारसायकलने त्यांना जोराची धडक दिली. त्यात मोटारसायकल खाली पडून तुषारला मुकामार लागला. तर साईराजच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागला. त्याला उपचारासाठी करमाळ्यात एका खासगी रुग्णालयात आणेल. मात्र तेथून त्याला लगेच उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान तेथील डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

Post a Comment

0 Comments