मुंबई |
'ख्वाडा' आणि 'बबन'च्या अभूतपूर्व यशानंतर भाऊराव कऱ्हाडेंच्या 'टीडीएम' चित्रपटात शुभचिंतन देणारा 'पिंगळा' ऐकवतोय राजा शिवबाची कथा
शिवजयंतीचे औचित्य साधत प्रदर्शित झालेल्या 'पिंगळा' या गाण्यातून ऐकायला मिळणार राजा शिवरायाची प्रशंसा
रात्र सरताच आणि तांबडं फुटायच्या आत पिंगळा खांद्याला भिक्षेची झोळी, हातात कंदील आणि एका हातात कुरमुड घेऊन वाट सरू लागतो. पारंपरिक पद्धतीने आणि शुभचिंतन देणारा हा पिंगळा हल्ली नाहीसाच झाला आहे. सध्याच्या तरुणाईला तर हा ज्ञात नसेल वा ऐकण्यातही नसेल. याच पिंगळ्याचा नवाकोरा अंदाज 'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे. विशेष म्हणजे पिंगळ्यावर असणाऱ्या या गाण्यात पिंगळा खुद्द शिवरायांची कथा ऐकवतोय ते ऐकणं नक्कीच कानांना मंत्रमुग्ध करून सोडणारं आहे.
'टीडीएम' चित्रपटातील 'पिंगळा' या गाण्यात शिवबाची कथा आणि त्यांच्या मावळ्याचा पराक्रम हा पिंगळ्याच्या तोंडून ऐकायला मिळतोय. "अन पिंगळा गातो, राजा शिवरायांची गाथा" असे बोल असणाऱ्या आणि दिवसाची सुरुवातच मोहक करणाऱ्या अशा या पिंगळ्याने केलेली राजाची स्तुती नक्कीच कौतुकास्पद आहे. पिंगळ्याने केलेल्या या स्तुतीमध्ये 'टीडीएम' चित्रपटाचा मुख्य नायक पृथ्वीराजला त्याच्या कलागुणांना जोपासताना पाहणं ही उत्सुकतेचे ठरतंय. याच चित्रपटातील 'एक फुल' या गाण्याने तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलंय. आता या चित्रपटातील 'पिंगळा' हे मराठी मातीतील असं नवं कोर गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याच्या संगीताची आणि गायनाची बाजू गायक वैभव शिरोळे यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे, यांत वादच नाही. तर या गाण्याला दशरथ भाऊराव शिरोळे यांनी शब्दबद्ध केले आहे.
'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडण्यास सज्ज झाले आहेत. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत 'टीडीएम' चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहेत. एक फुल या गाण्याने तर धुमाकूळ घातलाच आहे आता शिवबाची स्तुती करणार पिंगळा हे गाणं रसिक प्रेक्षकांच्या दिलाचा ठेका घेईल यांत वादच नाही. २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.
0 Comments