माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या भावाची आत्महत्या

 
 माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या चुलत भावाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली आहे.शिवराज पाटील चाकूरकर यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर पाटील चाकूरकर (वय ८१) हे लातूर शहरातील आदर्श कॉलनी भागात राहत होते. दैनंदिन ते सकाळी फिरायला बाहेर जात असत. फिरुन आल्यानंतर ते प्रथम शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी जायचे आणि नंतर स्वतःच्या घरी जात असायचे. चहापानानंतर ते न्यूजपेपर वाचत असायचे.

शिवराज पाटील चाकूरकर यांच्या परिवारातील सदस्य नेहमी
लातूरमधील घरी उपस्थित नसतात. मात्र आज शिवराज पाटील चाकूरकर यांचे चिरंजीव शैलेश पाटील हे सकाळी लातूरमधील घरी उपस्थित होते.  नेहमीप्रमाणे चंद्रशेखर पाटील बाहेरुन फिरुन आल्यावर ते चहा घेत होते तर शैलेश पाटील हे दुस-या मजल्यावर घरात फ्रेश होत होते. चंद्रशेखर पाटील फिरुन येवून बसल्यानंतर काही वेळाने हॉलमधून गोळीचा आवाज आला. घरातील नोकरासह शैलेश पाटील हे पळत आले असता चंद्रशेखर पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती तात्काळ लातूर पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करायला सुरुवात केल्याचे सांगण्यात आले आहे.

मयत चंद्रशेखर पाटील हे वडिलोपार्जित शेती पाहत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आणि दोन मुली आहेत. सर्वच विवाहीत आहेत. मयत चंद्रशेखर हे सध्या एका मुलाबरोबर शेजारीच असलेल्या फ्लॅट मध्ये राहत होते. वय अधिक झाल्याने त्यांना अनेक आजार होते असे सांगण्यात आले आहे. सततच्या आजाराने ते त्रस्त होते. घरात मुलगा-सुन-नातवंडे असल्यामुळे त्यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या 'देवघर' या निवासात आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मयत चंद्रशेखर पाटील चाकूरकर याचे चिरंजीव अॅड. लिंगराज पाटील यांनी सांगितले की, मयत चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांची बायपास झालेली होती. त्यातच अनेक आजार त्यांना झाले होते. नेहमीच्या
आजाराला ते कंटाळले होते. यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असे सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments