बार्शी |
बार्शी तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेने चालू वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अतिवृष्टी, सततधार पाऊस पडल्याने पिकाची वाढ न होणे, पिकाचा फुलोरा गळणे, सोयाबीनच्या झाडाला शेंगा नसणे, असतील तर शेंगा कमी असणे, लहान असणे अशा अनेक कारणामुळे चालू वर्षी पिकाचे नुकसान झाले होते.
तालुक्यात खरीप हंगामातील पिकविमा भरलेल्या १ लाख १ हजार २८ शेतकऱ्या पैकी ९८ हजार शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याची पूर्वसूचना दिल्या होती. तर विमा कंपनीने पंचनामे केल्यानंतर ५ हजार ११० शेतकरी अपात्र ठरवले होते. तसेच तालुक्यातील ७६ हजार शेतकऱ्यांना ६५ कोटी पिक विमा वाटप करण्यात आला आहे.
तहसील कार्यालय बार्शी येथे नायब तहसीलदार संजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, जिल्हापिक विमा प्रतिनिधी जगदीश कोळी, शेतकरी प्रतिनिधी राहुल भड, हर्षवर्धन बोधले, महेश चव्हाण, अशोक माळी, वैशाली ढगे आदी उपस्थित होते. जिल्हापिक विमा प्रतिनिधी यांनी शेतकऱ्यांच्या बैठकीत सांगितले की, शेतकऱ्यांनी २५ जानेवारीचे बेमुदत उपोषण मागे घ्यावे, तालुक्यातील पीक विम्यापासून वंचित असणारे १७ हजार ५०० शेतकऱ्यांना पिक विमा १५ दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल.
0 Comments