लाचेत अडकलेला पांगरी पोलीस स्टेशनचे 'एपीआय' नागनाथ खुणे अन्‌ पोलिस शिपाई निलंबित


सोलापूर |


तक्रारदार व त्याच्या भावाला नॉमिनल अटक करून जामिनावर सोडण्यासाठी ३० हजारांच्या लाचेची मागणी व चहा कँटीन चालकामार्फत लाचेची रक्कम स्वीकारल्याने पांगरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नागनाथ खुणे व पोलिस शिपाई सुनील बोदमवाड या दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.


पांगरी पोलिस ठाण्यात तक्रारदार व त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. त्यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तरीसुद्धा त्या गुन्ह्यात दोघांनाही नॉमिनल अटक करून जामिनावर सोडण्यासाठी दोघांकडून प्रत्येकी १५ हजारांची लाच मागण्यात आली. पांगरीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक खुणे याने पोलिस शिपाई बोदमवाड याच्याकडे ती रक्कम देण्यास सांगितले. तक्रारदाराने ११ जानेवारीला बार्शीत येऊन बोदमवाड याची भेट घेतली. त्याच्या सांगण्यावरून तक्रारदाराने ती रक्कम पोलिस ठाणे परिसरातील चहा कँटीन चालक हसन इस्माइल सय्यद याच्याकडे द्यायला सांगितली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिल्याची त्यांना काहीच कल्पना नव्हती. दरम्यान, लाचेची रक्कम चहा कँटीन चालकाने स्वीकारली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखालील तीन पथकांनी सहायक पोलिस निरीक्षक खुणे, पोलिस शिपाई बोदमवाड व चहा कँटीन चालक या तिघांना एकाचवेळी पकडले. न्यायालयाने त्यांना गुरुवारी (ता. १२) एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली. त्यांना उद्या (शनिवारी) न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, तपासात अडथळा नको, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पारदर्शक तपास करता यावा म्हणून त्या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

तत्कालीन अधिकाऱ्याकडे पुन्हा पांगरीचा पदभार

पांगरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल यांच्याकडे पांगरी पोलिस ठाण्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. सध्या ते बार्शी शहरात कार्यरत होते. तीन महिन्यांपूर्वीच खुणे याच्याकडे पांगरीचा पदभार देण्यात आला होता. दरम्यान, लाच प्रकरणात अडकलेल्या सहायक पोलिस निरीक्षक खुणे व पोलिस शिपाई बोदमवाड या दोघांना सेवेतून निलंबित केल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments