दररोजची मारहाण आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून महिलेने पतीला दांडक्याने मारहाण करत त्याची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील रायबरेलीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून, न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
अन्नू असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून, ती ब्युटी पार्लर चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती. महिलेचा पती अतुलला दारुचे व्यसन होते. दारुच्या नशेत दररोज तो पत्नीला मारहाण करायचा. अखेर या जाचाला कंटाळून महिलेने टोकाचा
निर्णय घेतला.
आधी मारहाण केली मग हत्या
बछरावा पोलीस ठाण्याअंतर्गत सेहगो पश्चिम गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. 15 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे अतुल दारु पिऊन घरी आला आणि पत्नीला मारहाण करु लागला. यादरम्यान अन्नूने पलंगाचा पाय उचलून अतुलच्या डोक्यात घातला. यानंतर अतुल बेशुद्ध झाला. बेशुद्धावस्थेत तिने पतीचा गळा आवळून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या
केल्यानंतर रात्रभर महिला पतीच्या मृतदेहाजवळ आरामात झोपली. सकाळी उठल्यानंतर मुलांना सांगितले पप्पांना उठवू नका नाहीतर मारतील. त्यानंतर ती ब्युटी पार्लरमध्ये निघून गेली.
दिवसभर ब्युटी पार्लरमध्ये काम केल्यानंतर संध्याकाळी घरी आली. रात्रीचे जेवण बनवले. मुलांसोबत जेवण करुन त्यांना झोपवले. मग रात्री उशिरा बाहेर कुणीही नसल्याची खात्री करत मृतदेह खेचत सोसायटीच्या गेटजवळ नेऊन ठेवला.
हत्या करुन दारु पिऊन मेल्याचा कांगावा सकाळी उठल्यानंतर स्वतःचा आरडाओरडा करत पती दारु पिऊन पडून मेल्याचा कांगावा केला. यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेत
शवविच्छेदनासाठी पाठवला.
प्रकरणाचा तपास सुरु करत पोलिसांनी पत्नीची चौकशी केली. पत्नीच्या जबाबात पोलिसांना तफावत आढळल्याने तिच्यावर संशय बळावला. पोलिसांनी तिला ताब्यात घेत तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी महिलेला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणाचा तात्काळ छडा लावत आरोपीला अटक केल्याप्रकरणी पोलीस अधिक्षकांनी तपासकरणाऱ्या पोलीस पथकाला 10 हजार रुपये बक्षिस घोषित केले.
0 Comments