संस्कृती जपण्यासाठी नद्या जपा अस्लम सय्यद यांचे आवाहन

कोल्हापूर |

संस्कृती जपण्यासाठी नद्या जपा अस्लम सय्यद यांचे आवाहन
 नदीकाठी संस्कृती वसलेली आहे. परंतु अलीकडे मानवी हस्तक्षेपामुळे नद्यांचा ऱ्हास होत असल्याने पर्यायाने संस्कृतीचेही उच्चाटन होत आहे. संस्कृती जपण्यासाठी आपल्याला नद्या जपल्या पाहिजेत, असे मत मुंबई येथील पर्यावरण फोटोग्राफर आणि चेन्नई फोटो बिनालेचे विभागीय समन्वयक अस्लम सय्यद यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या वतीने आयोजित पर्यावरण फोटोग्राफी या विषयावर ते बोलत होते.

सय्यद म्हणाले, नदीकाठच्या संस्कृतीचे तातडीने डॉक्युमेंटेशन होणे आवश्यक आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील नद्या गटारांमध्ये परावर्तित झालेल्या आहेत. नागरीकरणाचा रेटा वाढत चालल्याने मूळ संस्कृतीला धक्के बसले आहेत. मूळ संस्कृतीचे जतन करणे या काळात खूपच गरजेचे आहे. एखादी नदी नष्ट होते तेव्हा नदीकाठच्या लोकांची भाषा, संस्कृती, लोक व्यवहार हे सर्व नष्ट होते. नदीचे आणि नदीकाठच्या लोकसमूहाचे अतूट नाते आहे. मात्र आधुनिकीकरणाच्या दबावात हे नाते संपुष्टात येऊ लागले आहे. विकासाच्या नावाखाली नद्यासह पर्यावरणाचा आणि जैवविविधतेचा मोठा ऱ्हास केला जात आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

फोटोग्राफी करत असताना माणसाच्या जगण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. कोणत्याही प्रकारची फोटोग्राफी माणसांकडे जायला हवी. विशेषतः समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर असणारे आदिवासी आणि इतर लोकसमूह यांच्याकडे फोटोग्राफीने विशेष लक्ष दिले पाहिजे, असे मत सय्यद यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी केलेल्या मुंबई लगतच्या नद्या आणि लोकसंस्कृती यावर आधारित केलेल्या फोटोग्राफीचे सादरीकरण केले. चेन्नई फोटो बिनालेच्या फोटोग्राफी स्पर्धेबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी केले. अभिजीत गुर्जर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. मतीन शेख यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी, फ्रीलान्स फोटोग्राफर  उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments