शिवाजी विद्यापीठ ‘भारतीय लोकशाही आणि निवडणुकांचा अभ्यास’ हे व्याख्यान संपन्नकोल्हापूर / प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर आणि राज्यशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक १९/११/२०२२ रोजी ‘सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील व्याख्यानमाले’ अंतर्गत ‘भारतीय लोकशाही आणि निवडणुकांचा अभ्यास’ या विषयावर  डॉ. अभय दातार पीपल्स कॉलेज, नांदेड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी भूषवले. ज्येष्ठ पत्रकार मा. श्री दशरथ पारेकर यांची कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. अभय दातार यांनी ‘भारतीय लोकशाही आणि निवडणुकांचा अभ्यास’ या विषयासंबंधी मांडणी करताना  स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया आणि स्वातंत्र्योत्तर  काळातील विविध निवडणुकांचा आढावा घेतला. त्यासाठी कोणकोणत्या अभ्यास पद्धती उपयोगात आणल्या जातात याची विस्ताराने मांडणी केली. तसेच या विषयातील दुर्लक्षित संशोधन क्षेत्रावर प्रकाश टाकला. निवडणूक विषयावर संशोधन करताना संख्यात्मक पैलूं बरोबरच गुणात्मक पैलू अभ्यासण्याची गरज प्रतिपादित केली. व्याख्यानानंतर उपस्थित विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत असताना त्यांच्या शंका व प्रश्नांचे समाधान केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री दशरथ पारेकर यांनी केले. त्यामध्ये त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जीवनातील अनेक पैलू उघड केले. राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यामध्ये त्यांनी निवडणुका आणि पक्षपद्धती व राजकीय पक्षांची विविध पातळीवरील कामगिरी यांचा विविधांगी अभ्यास करणे आवश्यक आहे असे सांगितले. आपल्या विवेचनात तरुण संशोधकांनी विविध क्षेत्रे निवडली पाहिजेत. तसेच तितक्याच समर्पित भावनेने संशोधन केले पाहिजे असे नमूद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. जयश्री कांबळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. नेहा वाडेकर यांनी करून दिली. तसेच आभार संशोधक विद्यार्थी गणेश सातपुते यांनी मानले. कार्यक्रमासाठी अधिविभागातील एम. ए. भाग १ व २ चे विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments